आंबोली नांगरतास अपघात प्रकरणी चालकावर सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

​आंबोली:
आंबोली नांगरतास येथे ट्रक आणि व्हॅगनार कार यांच्यात घडलेल्या भीषण अपघातात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका मद्यधुंद ट्रक चालकाने कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या प्रकरणी निष्काळजीपणे गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक चालक महेश दयानंद मठपती (वय २७, रा. हेब्बाळ, गडहिंग्लज) याच्या विरुद्ध आंबोली पोलिसांत सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​हा अपघात बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मायकल डिसोजा यांच्या आंबोलीतील नांगरतास फार्म हाऊसजवळ घडला. एमएच-१०-एडब्ल्यू-७९४३ या क्रमांकाचा ट्रक रस्त्याच्या विरुद्ध बाजूने भरधाव वेगात येत होता. याच वेळी समोरून येणाऱ्या एमएच-०४-एचएम-०२१७ या क्रमांकाच्या व्हॅगनार कारला या ट्रकने भीषण धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार अपघाताच्या वेळी ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. या अपघातात माणगाव-कट्टावाडी येथील २७ वर्षीय केशव दत्ताराम केसरकर आणि ३२ वर्षीय संतोष रामचंद्र धुरी हे दोघे जखमी झाले.
​घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार मनीष शिंदे आणि लक्ष्मण काळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या दोन्ही जखमींना तातडीने बाहेर काढले. जखमींना सुरुवातीला उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र दुखापतींचे गांभीर लक्षात घेऊन प्राथमिक उपचारानंतर त्यांना कॉटेज हॉस्पीटल येथे हलविण्यात आले.
​या अपघाताची खबर व्हॅगनार कारमधील जखमी केशव केसरकर यांनी आंबोली पोलीस दूरक्षेत्राला दिली.
केशव यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, अपघातात गंभीर दुखापत झालेल्या संतोष धुरी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
​दरम्यान, या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास आंबोली पोलीस करत आहेत.