आंबोलीत तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी ‘ट्रॉमा केअर सेंटर’ उभारण्यात यावे

आंबोली ग्रामपंचायततर्फे पालकमंत्र्यांना निवेदन

वाढते अपघात टाळण्यासाठी मद्यपान तपासणी केंद्र उभारण्याचीही मागणी

आंबोली । प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या आंबोली येथे कायमस्वरूपी मद्यपान (ड्रिंक अँड ड्राईव्ह) तपासणी केंद्र आणि तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी ‘ट्रॉमा केअर सेंटर’ उभारण्यात यावे, अशी मागणी आंबोली ग्रामपंचायतीच्या वतीने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

​आंबोली हे प्रमुख पर्यटन केंद्र असून बेळगाव, कोल्हापूर आणि कोकणाला जोडणाऱ्या घाटमार्गामुळे या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, मद्यपान करून वाहने चालवण्यामुळे गेल्या काही महिन्यांत या भागात अनेक प्राणघातक अपघात झाले आहेत. येथील तपासणी नाक्यावर चालकांची मद्यपान चाचणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’चे प्रमाण वाढले आहे. यावर नियंत्रणासाठी कायमस्वरूपी मद्यपान तपासणी यंत्रणा बसवणे अत्यावश्यक बनले आहे.

​तसेच, घाटातील अपघातातील बाधितांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यासाठी आंबोलीत ट्रॉमा केअर सेंटर उपलब्ध नाही. परिणामी, गंभीर जखमींना सावंतवाडी, पणजी किंवा बेळगाव येथे उपचारासाठी नेण्यात मोठा वेळ जातो आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.

​या दोन्ही महत्त्वाच्या समस्यांची दखल घेऊन आंबोली परिसरात तातडीने मद्यपान तपासणी यंत्रणा कार्यान्वित करावी आणि ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करावी, यासाठी संबंधित यंत्रणांना योग्य ते निर्देश द्यावेत, अशी नम्र विनंती ग्रामपंचायतीच्यावतीने निवेदनाद्वारे केली आहे.