सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सोयी-सुविधा द्या व रिक्त पदे भरा

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे आदेश

अभिनव फाउंडेशनच्या जनहित याचिकेवर महत्त्वपूर्ण सुनावणी

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा वाद अखेर मिटला

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिट आणि वैद्यकीय सुविधांच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देशांनुसार ट्रामा केअर युनिटसाठी प्रतिनियुक्तीवर एक अस्थिव्यंग तज्ञ (ऑर्थोपेडिक) डॉक्टर तात्काळ उपलब्ध करून देण्याचे, शस्त्रक्रियेसाठी अत्यंत आवश्यक असलेले सी-आर्म मशीन आठ आठवड्यांत व इतर आवश्यक यंत्रसामग्री चार आठवड्यांत खरेदी करण्याचे तसेच रुग्णालयातील सर्व रिक्त वैद्यकीय अधिकारी पदे येत्या सहा महिन्यांत भरण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

या सुनावणीदरम्यान सावंतवाडी येथील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेला वाद मिटल्याची दिलासादायक माहिती न्यायालयात देण्यात आली असून, जागेचा प्रश्न सुटल्याने यासंदर्भात वेगाने पुढील कार्यवाही करण्याचे आरोग्य संचालक डॉ. नितीन आंबाडेकर यांनी मान्य केले आहे.

​अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर आज न्यायमूर्ती निरज धोते आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या न्यायपीठासमोर महत्त्वाची सुनावणी पार पडली. या याचिकेत अभिनव फाउंडेशनच्या वतीने वकील महेश राऊळ, वकील मिहीर मोंडकर आणि वकील निरज लवटे यांनी तर सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील विकास माळी आणि वकील शिरीष हिरे यांनी बाजू मांडली. अभिनव फाउंडेशनने दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी तत्कालीन न्यायमूर्ती कर्णिक यांनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेसंदर्भातील द्वितीय अपील वेगाने निकाली काढण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राजघराण्यातील दोन्ही कुटुंबांमध्ये तडजोड झाल्याने जागेच्या वादाचे द्वितीय अपील अखेर निकाली निघाले आहे. त्यामुळे आता सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली.

​सुनावणीदरम्यान अभिनव फाउंडेशनचे वकील महेश राऊळ यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, आरोग्य उपसंचालक कोल्हापूर यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय समितीचा अहवाल ऑक्टोबर २०२६ मध्ये सादर झाला होता, परंतु त्यावर अद्याप कोणतीही प्रत्यक्ष कार्यवाही झालेली नाही. यावर तीव्र दखल घेत न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी समितीच्या अहवालात नमूद केलेली सर्व आवश्यक वैद्यकीय यंत्रणा चार आठवड्यांत खरेदी करण्याचे आणि शस्त्रक्रियेसाठी गरजेचे असलेले सी-आर्म मशीन आठ आठवड्यांत उपलब्ध करण्याचे निर्देश दिले.

आरोग्य संचालकांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून पुढील सुनावणीपर्यंत संपूर्ण कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, तसेच पुढील सुनावणीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वैयक्तिकरीत्या हजर राहून केलेल्या कारवाईची माहिती द्यावी, असेही आदेश सर्किट बेंचने दिले आहेत.

​दरम्यान, प्रशासकीय पातळीवरून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिटसाठी डॉ. सचिन बळवते या अस्थिव्यंग तज्ञाची प्रतिनियुक्तीवर तात्काळ नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित सर्व रिक्त पदांबाबत आरोग्य विभागाच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले की, १४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली असून भरती प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. या भरती प्रक्रियेतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला आवश्यक वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून दिले जातील आणि पुढील सहा महिन्यांत सर्व रिक्त पदे पूर्णपणे भरली जातील.

या महत्त्वपूर्ण सुनावणीच्या वेळी अभिनव फाउंडेशनच्या जनहित याचिकेचा पाठपुरावा करणारे आरोग्य समितीचे अध्यक्ष एन. बी. रेडकर, तेजल परब आणि राहु ।ल परब हे न्यायालयात उपस्थित होते. न्यायालयाच्या या कडक भूमिकेमुळे आणि आदेशांमुळे सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.