खेड (राकेश कोळी) : खेड शहरातील महात्मा फुले नगर परिसरात मानवी वस्तीच्या ठिकाणी प्रथमच दुर्मिळ आणि विषारी ‘बांबू पिट वायपर’ अर्थात ‘चापडा’ जातीचा साप आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास हा साप आल्यानंतर त्यांनी तात्काळ वन्यजीव रक्षकांना माहिती दिली.

माहिती मिळताच वन्यजीव रक्षक सर्वेश पवार, रोहन खेडेकर, ओमकार चिखले तसेच नगरसेवक यश खेडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सुरक्षित पद्धतीने सापाला रेस्क्यू करून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. साप मानवी वस्तीजवळ आढळल्याने शहरातील सर्पमित्र आणि नागरिकांमध्येही या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
बांबू पिट वायपरचा अधिवास प्रामुख्याने घनदाट जंगले, बांबूची बेटे, झुडपे, वेली तसेच ओलसर भागांमध्ये आढळतो. हा साप बहुतांश वेळ झुडुपांवर किंवा वेलींवर वास्तव्य करतो. तो निशाचर आणि सामान्यतः शांत स्वभावाचा असला तरी त्याला धोका जाणवल्यास किंवा अचानक स्पर्श झाल्यास तो वेगाने दंश करू शकतो.
या सापाचे विष हेमोटॉक्सिक स्वरूपाचे असल्याने दंश झाल्यास रक्ताभिसरण आणि शरीरातील पेशींवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारचा साप आढळल्यास त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न न करता तात्काळ प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन्यजीव रक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
खेड शहरातील शहरी भागात या दुर्मिळ विषारी सापाचा झालेला वावर हा परिसरातील जैवविविधतेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे.












