सावंतवाडी:
येथील बहुप्रतिक्षित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून याचे संपूर्ण श्रेय माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनाच जाते. आमदार कसा असावा, याचे ते उत्तम उदाहरण आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केली. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सावंतवाडी मतदारसंघातील जनतेच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न आता कायमचा मिटणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आनंदाप्रत्यर्थ दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयासमोर शिवसैनिकांनी जोरदार फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले की, आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस असता तर कदाचित पाठपुरावा सोडून दिला असता. मात्र आमदार दीपक केसरकर यांनी हा विषय कधीच सोडला नाही. त्यांनी या कामात सातत्य ठेवून न्यायालयीन लढाईत विजय मिळवला आहे. यामुळे मतदारसंघातील सर्वसामान्यांचे आरोग्याबाबत होणारे हाल आता थांबणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या लोकोपयोगी कामामुळे जनतेचे आशीर्वाद नेहमीच दीपक केसरकर यांच्या पाठीशी राहतील. याशिवाय आयुष ओपीडीचा विषयही मार्गी लागला असून त्यासाठी वीज, पाणी आणि कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शिरोडा वेळागर येथील पंचतारांकित हॉटेलसाठी दीपक केसरकर यांनी तब्बल दहा वर्षे सतत प्रयत्न केले, त्यालाही आता यश आले आहे, असे सांगत श्री. परब यांनी आमदार केसरकर यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर यांनी आरोग्य विषयावरून सातत्याने होणाऱ्या टीकेला उत्तर दिल्याचे सांगत आपले मत मांडले. त्या म्हणाल्या की, आरोग्याच्या प्रश्नावर विरोधकांकडून नेहमीच टीका केली जात होती. मात्र, केसरकर यांनी आज आपल्या कर्तृत्वाने त्या सर्व टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. दोन घराण्यांमधील वादात अडकलेला जागेचा तिढा आज न्यायालयातून सुटला असून यामुळे दीपक केसरकर यांचे सावंतवाडीसाठीचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होणार आहे.
या आनंदोत्सवाच्या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, शहरप्रमुख बाबु कुडतरकर, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य तथा आमदारांचे प्रतिनिधी देव्या सुर्याजी, नगरसेवक अजय गोंदावळे, शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी आणि स्नेहा नाईक यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













