मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या निकालानंतर नगराध्यक्षा श्रद्धाराजेंनी मानले आभार
राजघराण्याकडून लोककल्याणाची ही परंपरा अशीच चालू राहील
सावंतवाडी:
सावंतवाडी शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न श्री देव पाटेकर व श्री देव उपलकर यांच्या आशीर्वादाने अखेर सुटला असून, शहराच्या दृष्टीने आज एक अत्यंत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राजघराण्याने नेहमीच जनतेच्या हितासाठी काम केले असून, यापुढेही लोककल्याणाची ही परंपरा अशीच चालू राहील, अशी ग्वाही सावंतवाडीच्या नगराध्यक्षा तथा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी आज येथे दिली.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत माहिती देताना नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी सांगितले की, सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून राजघराणे आणि शासन यांच्यामध्ये अडकून पडला होता. परंतु सकारात्मक चर्चेतून आणि प्रयत्नांतून हा विषय आज यशस्वीपणे मार्गी लागला आहे. सावंतवाडीच्या राजघराण्याने नेहमीच लोकहिताला प्राधान्य दिले असून जनतेच्या गरजांसाठी आपली जागा मोफत अथवा सहकार्याच्या भूमिकेतून देण्याचे काम केले आहे. यापूर्वीही शहरातील सुंदर गार्डन, नगरपालिका इमारत, शिक्षण संस्थांचे कॉलेज तसेच रुग्णालय यांसारख्या सार्वजनिक आणि नागरी सुविधांच्या उभारणीसाठी राजघराण्याने नेहमीच आपली जागा उपलब्ध करून दिली आहे.
या ऐतिहासिक क्षणी नगराध्यक्षा या नात्याने त्यांनी राजेसाहेब खेमसावंत भोंसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले आणि युवराज लखमराजे भोंसले यांचे विशेष आभार मानले. त्याचप्रमाणे या प्रश्नाची तड लावण्यासाठी राज्य व केंद्र स्तरावरून मोलाचे सहकार्य करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे तसेच स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल व सातत्यपूर्ण मेहनतीबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त केले. लोकप्रतिनिधी, शासन आणि राजघराणे यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच हा प्रलंबित प्रश्न सुटू शकला असून, येणाऱ्या काळातही सावंतवाडीच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी राजघराणे सदैव तत्पर राहील, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.













