संतोष सावर्डेकर/चिपळूण:
चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून, रस्त्यांवरील खड्डे, खचलेल्या साईडपट्ट्या आणि रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडीझुडपे यामुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक रस्त्यांवरून प्रवास करताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. विशेष म्हणजे रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यांची परिस्थिती पाहता हा निधी नेमका कुठे खर्च होतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांचे प्रत्यक्ष परीक्षण आणि आर्थिक लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शासनाकडून गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. चिपळूण तालुक्यातील विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र, डांबरीकरण झाल्यानंतर काही काळातच रस्त्यांची दुरवस्था होत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी लाखो रुपयांची तरतूद आणि ठेके दिले जात असल्याची माहिती असतानाही प्रत्यक्षात वाहनचालकांची खड्ड्यांतून सुटका होताना दिसत नाही.
पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ‘मैलकुली’ ही व्यवस्था कार्यरत होती. संबंधित कर्मचारी आपल्या हद्दीतील रस्त्यांची नियमित देखभाल करत असत. रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडीझुडपे काढणे, पावसाळ्यानंतर रस्त्यांवर पडलेले छोटे-मोठे खड्डे बुजवणे, साईडपट्ट्यांची निगा राखणे अशा स्वरूपाची कामे त्यांच्यामार्फत केली जात होती. त्यामुळे रस्त्यांची स्थिती नियंत्रणात ठेवण्यास मदत होत होती. रस्त्याच्या बाजूची झाडी वेळोवेळी काढली जात असल्याने समोरून येणारी वाहने स्पष्ट दिसत असत. मात्र, कालांतराने ‘मैलकुली’ ही व्यवस्था जवळपास संपुष्टात आली. रिक्त जागा भरल्या जात नसल्याने या कामांची जबाबदारी आता प्रामुख्याने ठेकेदारांवर सोपवली जात आहे.
ठेकेदारांमार्फत रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती, खड्डे बुजविणे, झाडीझुडपे काढणे आदी कामांसाठी लाखो रुपयांचे ठेके दिले जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात अनेक ग्रामीण रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य कायम असून, दुतर्फा झाडी वाढल्याने रस्ते अरुंद झाल्यासारखे दिसत आहेत. काही ठिकाणी समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने वळणांवर अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी, एसटी बस आणि खासगी वाहनचालकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात तर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नाही. परिणामी वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच अपघात होण्याची शक्यताही वाढते.
एकेकाळी ग्रामीण भागातील रस्त्यांवर डांबराचा थर स्पष्टपणे दिसत असे. रस्त्यांवरील डांबर निघाले किंवा खड्डे पडले तर त्यांची तातडीने दुरुस्ती केली जात असे. आता मात्र अनेक ठिकाणी डांबरी रस्त्यांवरील डांबरच गायब झाल्याचे चित्र आहे. रस्त्यांवर खडी उघडी पडली असून, काही ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून तयार केलेल्या रस्त्यांची काही वर्षांतच अशी अवस्था का होते? डांबरीकरणाच्या कामांचा दर्जा तपासला जातो का? काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदारांकडून देखभाल केली जाते का? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
रस्त्यांच्या दुरवस्थेत खचलेल्या साईडपट्ट्यांचीही भर पडली आहे. अनेक ठिकाणी मुख्य रस्त्याच्या बाजूची माती वाहून गेल्याने रस्त्याचा कडा कमकुवत झाला आहे. समोरून मोठे वाहन आल्यास दुचाकी किंवा लहान वाहनांना बाजूला घेणे धोकादायक ठरते. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडांच्या फांद्या आणि झुडपांमुळे दृश्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे केवळ खड्डे बुजवून प्रश्न सुटणार नाही, तर रस्त्यांच्या संपूर्ण देखभालीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
दुसरीकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे करून घेणाऱ्या ठेकेदारांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची चर्चा आहे. पूर्वी केलेल्या कामांची बिले वेळेत मिळत नसल्याने काही ठेकेदार अडचणीत सापडले आहेत. निधीची उपलब्धता, बिलांची रखडपट्टी आणि कामांचा दर्जा या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने ठोस धोरण आखण्याची गरज आहे. मात्र, ठेकेदारांची आर्थिक अडचण असली तरी नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
देखभाल-दुरुस्तीच्या कामांचे ऑडिट होणार का?
ग्रामीण रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी किती निधी मंजूर झाला, कोणत्या ठेकेदाराला किती रकमेचा ठेका देण्यात आला, प्रत्यक्षात किती काम झाले आणि त्यावर किती खर्च झाला, याची सविस्तर माहिती सार्वजनिक होणे आवश्यक आहे. केवळ कागदोपत्री कामे पूर्ण दाखवण्याऐवजी प्रत्यक्ष रस्त्यांची पाहणी करून कामांचा दर्जा तपासला पाहिजे. आवश्यकतेनुसार स्वतंत्र तांत्रिक तपासणी आणि आर्थिक ऑडिट केल्यास वस्तुस्थिती समोर येऊ शकते. निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करणेही गरजेचे आहे.
ग्रामीण भागातील रस्ते हे केवळ वाहतुकीचे साधन नसून गावांच्या विकासाची जीवनवाहिनी आहेत. शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांचा दैनंदिन प्रवास याच रस्त्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे रस्त्यांचे डांबरीकरण करण्याबरोबरच त्यांची नियमित देखभाल, साईडपट्ट्यांची दुरुस्ती आणि झाडीझुडपांची सफाई यांना प्राधान्य मिळाले पाहिजे. अन्यथा कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था कायमच बिकट राहण्याची भीती आहे.
आता सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ ठेके देण्यापुरती भूमिका न ठेवता प्रत्यक्ष कामावर लक्ष ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविणे, साईडपट्ट्या दुरुस्त करणे आणि रस्त्यालगतची झाडी हटविणे ही कामे तातडीने हाती घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर मागील काही वर्षांतील देखभाल-दुरुस्तीच्या कामांचे ऑडिट करून निधीच्या विनियोगाचा हिशेब जनतेसमोर मांडला पाहिजे. लाखो रुपयांचे ठेके आणि कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही रस्त्यांची चाळण कायम असेल, तर या कामांचा उपयोग नेमका कोणासाठी? हा प्रश्न आता चिपळूण तालुक्यातील ग्रामीण जनतेकडून उपस्थित केला जात आहे.













