खेड तालुक्यात कुपोषित बालकांसाठी तपासणी व पौष्टिक लाडू वाटप शिबिर संपन्न

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील कुपोषित बालकांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना पूरक पोषण आहार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे विशेष तपासणी व पौष्टिक लाडू वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात बालरोग तज्ज्ञांकडून कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात कुपोषित बालकांना पौष्टिक लाडू तसेच पूरक पोषण आहाराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. यावेळी सहभागी बालकांना जंतनाशक औषधे, प्रोटीन पावडर, रक्तवाढीची औषधे आणि आवश्यक टॉनिकचे वाटप करण्यात आले.
डॉ. विलास शेळके यांनी कुपोषणमुक्तीसाठी स्वच्छता, संतुलित व पूरक पोषण आहार, नियमित लसीकरण तसेच बालकांचे वजन, उंची आणि दंडघेर यांचे नियमित मोजमाप करण्याचे महत्त्व याबाबत पालकांना मार्गदर्शन केले. बालकांच्या वाढीचा नियमित आढावा घेऊन आवश्यकतेनुसार वैद्यकीय उपचार व पोषण आहार देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमास डॉ. बालाजी सगरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भालेराव, RBSK कार्यक्रमाच्या जिल्हा पर्यवेक्षक आरती कदम, CDPO सौ. जगताप यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व RBSK वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, METRAN हळदणकर मॅडम तसेच डेरवण हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
या शिबिराचा खेड तालुक्यातील एकूण २८ कुपोषित बालकांनी लाभ घेतला. बालकांच्या आरोग्याची तपासणी, औषधोपचार आणि पोषणविषयक मार्गदर्शनामुळे पालकांना कुपोषणाच्या समस्येवर प्रभावीपणे मात करण्यासाठी आवश्यक माहिती मिळाली.