२६ वर्षीय युवक ताब्यात : पेडणे पोलिसांची कारवाई
पेडणे : प्रतिनिधी
पेडणे पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात कारवाई करत धारगळ येथे छापा टाकून सुमारे एक लाख रुपये किमतीचे ९३.५२ ग्रॅम ‘हशीश ऑइल’ जप्त केले. या प्रकरणी नागराज विरप्पन ऊर्फ हिरप्पा बद्रापूर (वय २६) याला ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित सध्या भूतवाडी विर्णोडा येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई १९ ऑगस्ट रोजी दुपारी धारगळ येथील चोनवाडा परिसरात करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या सर्व्हिस रोडवर काळोजी वाईन स्टोअर्सजवळील वडाच्या झाडानजीक पोलिसांनी अमली पदार्थविरोधी छापा टाकला.
या कारवाई दरम्यान संशयित नागराज याच्याकडे असलेल्या स्कूटरची (क्र. GA-11-J-9348) तपासणी करण्यात आली. स्कूटरच्या डिकीत लपवून ठेवलेला काळसर रंगाचा अर्धद्रव पदार्थ पोलिसांना आढळून आला. हा अमली पदार्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘हशीश ऑइल’चा असल्याचा संशय असून त्याचे वजन ९३.५२ ग्रॅम आहे. जप्त केलेल्या पदार्थाची अंदाजे किंमत १ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी पेडणे पोलिस स्थानकाचे पीएसआय विवेक एच. हळर्णकर यांच्या तक्रारीवरून पेडणे पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय विवेक हळर्णकर करीत आहेत.
राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरात अमली पदार्थांच्या व्यवहाराचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. जप्त करण्यात आलेला पदार्थ नेमका कुठून आणण्यात आला, त्याची विक्री कुणाला केली जाणार होती तसेच या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का, या अनुषंगाने पुढील पोलिस तपास महत्त्वाचा ठरणार आहे.













