उमेद अभियानातून महिला सक्षमीकरण आणि शाश्वत उपजीविकेचा संकल्प!   

    ▪️हिरकणी प्रभाग संघ सुकळवाडची वार्षिकसभा कट्टा येथे उत्साहात संपन्न

मसुरे | झुंजार पेडणेकर :              हिरकणी प्रभाग संघ सुकळवाडची वार्षिकसभा कट्टा येथे प्रभाग संघ अध्यक्ष सौ मीनल पार्टे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ सुमेधा पाताडे, पंचायत समिती सदस्य श्री गावडे, तालुका अभियान व्यवस्थापक श्री रविकिरण कांबळे, तालुका व्यवस्थापक साळवे,प्रभाग समन्वयक श्री विरेश पवार,तालुका ब्लॉक अँकर सचिन किर्लोस्कर, प्रभाग सचिव सौ सीता मेस्त्री उपस्थित होते.

उमेद अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना, विशेषतः महिलांना, स्वयं सहाय्यता समूहांच्या माध्यमातून संघटित करून शाश्वत उपजीविका उपलब्ध करून देणे, आर्थिक आणि सामाजिक समावेशन साधणे आणि त्यांना गरिबीतून बाहेर काढणे हा आहे. प्रभाग संघ ही या संस्थीय रचनेतील अत्यंत महत्त्वाची कडी आहे.आपला प्रभाग संघ मॉडेल संघ होण्यासाठी उद्योग करा. आपल्या प्रभाग संघाचे तालुक्यात जिल्ह्यात नावलौकिक होऊ दे असे आवाहन सभापती सौ प्रज्ञा भाऊ चव्हाण यानी यावेळी केले.

सदर सभेला 590 महिला उपस्थित होत्या. यावेळी जि प सदस्या सौ सुमेधा पाताडे मॅडम यांनी प्रत्येक ग्राम संघांना कार्यालय उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. प्रस्तावना सौ सीता मेस्त्री व अहवाल वाचन सौ. प्राजक्ता नाईक यांनी केले,तसेच सूत्रसंचालन सौ प्रियाने पांडुरंग आंगणे यांनी केले.