देवगड बंदर विकासासाठी ८५ कोटींचा निधी; मच्छीमारांच्या सूचनांनुसार कामांना प्राधान्य देणार

बंदराची १०० टक्के क्षमतेने कार्यान्वित करण्याचा निर्धार; गाळ काढण्याच्या कामाला प्रथम प्राधान्य देण्याची मच्छीमारांची मागणी

देवगड : देवगड तालुक्यातील आनंदवाडी येथे बंदराची पाहणी करून मच्छीमारांच्या समस्या आणि सूचना जाणून घेताना पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी देवगड बंदराच्या विकासासाठी प्राप्त झालेल्या ८५ कोटी रुपयांच्या निधीचा योग्य पद्धतीने वापर केला जाईल, अशी ग्वाही दिली.

 

देवगड बंदर १०० टक्के क्षमतेने कार्यान्वित व्हावे आणि त्यातून मच्छीमारांसह जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळावी, हा या निधीमागील प्रमुख उद्देश असल्याचे ना. राणे यांनी स्पष्ट केले.

 

मंत्रालयात झालेल्या बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांकडून देवगड बंदरासाठी यापूर्वीही ८५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता, मात्र त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला नसल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास ठेवून पुन्हा ८५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे हा जनतेचा पैसा असून त्याचा योग्य आणि पारदर्शक पद्धतीने विकासकामांसाठीच वापर झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

 

देवगड बंदर विकासासाठी सुमारे २२ कामे प्रस्तावित असून त्यातील कोणती कामे प्रथम हाती घ्यावीत, याबाबत मच्छीमार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी प्राधान्यक्रम ठरवावा, असे आवाहन ना. राणे यांनी केले. “आम्ही मंत्रालयात बसून स्वतःच्या मनाने कामे निश्चित करण्यापेक्षा मच्छीमारांच्या प्रत्यक्ष गरजा जाणून घेऊन कामांना प्राधान्य देऊ,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

 

गाळ काढण्याच्या कामाला प्रथम प्राधान्य

 

बैठकीत मच्छीमारांनी देवगड बंदरातील गाळ काढण्याच्या कामाला सर्वप्रथम प्राधान्य देण्याची मागणी केली. बंदराच्या शेवटच्या टोकापर्यंत बोटी सुरक्षितपणे पोहोचतील, इतक्या प्रमाणात गाळ काढणे आवश्यक असल्याचे मच्छीमार प्रतिनिधींनी सांगितले. त्यानंतर जेटीची उर्वरित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.

 

मच्छीमार जगन्नाथ कोयंडे यांनी बंदर परिसरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या अडचणींकडे लक्ष वेधले. मासळी उतरवणे आणि विक्रीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

 

संजय बांदेकर यांनी आनंदवाडीच्या बाजूने छोट्या बोटींसाठी लँडिंगची सुविधा निर्माण करण्याची सूचना केली. बंदरातील संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करून आवश्यक ठिकाणी तिची उंची वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली. बोटी आत येताना सुरक्षितता राहावी आणि लहान मच्छीमार बोटींना सहजपणे लँडिंग करता यावे, यासाठी नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

 

मच्छीमारी संस्थांसाठी तीन पंप आणि कोल्ड स्टोरेजची मागणी

 

मच्छीमारांच्या चर्चेदरम्यान तीन पंप उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. तसेच मासळी साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेजची सुविधा उभारण्याची मागणी मांडण्यात आली.

 

भरतीच्या वेळी बोटी आत घेणे आणि ओहोटीच्या वेळी बोटींच्या हालचालींमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी बंदराच्या आराखड्यानुसार आवश्यक तांत्रिक कामे करण्यात यावीत, अशी मागणीही मच्छीमारांनी केली.

 

“बंदराचा चेहरामोहरा बदलायचा आहे”

 

देवगड बंदराची सद्यस्थिती बदलून आधुनिक आणि सक्षम बंदर उभारण्याचा आपला प्रयत्न असल्याचे ना. राणे यांनी सांगितले. “आज दिसणाऱ्या बंदरापेक्षा पूर्णपणे वेगळे आणि सक्षम बंदर भविष्यात दिसले पाहिजे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

देवगड बंदराच्या विकासामुळे मच्छीमारांची आर्थिक उन्नती होण्यासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नातही वाढ करण्याची क्षमता या बंदरात असल्याचे त्यांनी सांगितले. देवगडसह मालवण आणि सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या विकासासाठी या निधीचा योग्य वापर झाला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

२२ प्रस्तावित कामांमधून प्रथम कोणती चार-पाच कामे हाती घ्यावीत, याचा प्राधान्यक्रम मच्छीमारांच्या प्रतिनिधींनी ठरवावा आणि त्यानुसार मत्स्य विभागाने कामांना सुरुवात करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

 

देवगड बंदराचा विकास हा केवळ बंदरापुरता मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना देणारा ठरू शकतो. त्यामुळे उपलब्ध ८५ कोटी रुपयांचा निधी योग्य कामांवर खर्च करून बंदराचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

ना.राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मच्छिमारांसमवेत प्रकल्पाबाबतचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी माजी आमदार अजित गाेगटे, महाराष्ट— मत्स्याेद्याेग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले ,जिल्हाधिकारी तृप्ती धाेडमिसे, बाळा खडपे, भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, सभापती गणेश राणे, उपसभापती अमाेल लाेके, उद्याेगपती नंदकुमार घाटे,उपनगराध्यक्षा साै.मिताली सावंत, स्वच्छता सभापती बुवा तारी, अर्बन बँक अध्यक्ष प्रकाश राणे,कार्यकारी अभियंता कृष्णात निकम, प्रशासकीय अधिकारी किशाेर साळगावकर, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग सागर कुवेसकर, देवगडचे अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे, देवगड िफशरमेन्स साेसायटीचे चेअरमन द्विजकांत काेयंडे, तारामुंबरी मच्छिमारी संस्थेचे चेअरमन विनायक प्रभू तसेच स्थानिक मच्छिमार व ग्रामस्थ उपस्थित हाेते.मत्स्याेद्याेग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री.खपले यांनी प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या कामांची यावेळी माहिती दिली.यामध्ये प्रकल्पांतर्गत सध्या जेट्टीचे बांधकाम, कार्यशाळा, जाळी विणण्याचे शेड आणि गाळ काढण्याची कामे महाराष्ट्र मत्स्याेद्याेग विकास महामंडळार्माफत सुरू असून उर्वरित कामांमध्ये मासळी लिलाव गृह, प्रशासकीय इमारत, संरक्षण भिंत, पाण्याची टाकी, प्रसाधनगृह, अंतर्गत रस्ते, उपहारगृह, मच्छिमारांसाठी विश्रांतीगृह तसेच रेडिओ आणि कम्युनिकेशन सेंटर यांचा समावेश आहे असे त्यांनी यावेळी सांगीतले.स्थानिक मच्छिमारांनी यावेळी गाळ काढण्याचा कामाला प्राधान्यक्रम द्यावा अशी मागणी केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैभव करंगुटकर यांनी केले.