पावसाचा मुक्काम लांबल्याने मच्छीमार संकटात; येत्या अधिवेशनात मदत जाहीर करणार – पालकमंत्री ना. नितेश राणे

महायुती सरकारने मत्स्य व्यवसायाला दिला कृषी समकक्ष दर्जा

नुकसानभरपाईसाठी अधिवेशनात प्रस्ताव ठेवणार असल्याचे पालकमंत्रींचे आश्वासन

किसान क्रेडिट कार्ड व व्याज सवलतीचा लाभ आता मच्छीमारांनाही

मच्छीमार संघांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद

देवगड – यंदा पावसाचा मुक्काम लांबल्याने मच्छीमार व्यवसाय मोठ्या अडचणीत आला आहे. मात्र, मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्यात आल्याने यंदा या क्षेत्राला मदतीचा हात देणे आवश्यक आहे, असे सांगत येत्या अधिवेशनात मच्छीमारांसाठी भरघोस मदतीचा प्रस्ताव सादर करू, असे आश्वासन मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी दिले.

 

कुणकेश्वर येथे पारंपारिक, यांत्रिक व बिगर यांत्रिक मच्छीमार संघ यांच्या वतीने संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मच्छीमारांनी सांगितले की, ऑगस्ट महिन्यात बंदी उठली असली तरी पावसाचा मुक्काम लांबल्यामुळे अजूनही मासेमारी सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी सर्वच मच्छीमारांनी केली.

 

यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे म्हणाले की, “महायुती सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिल्यानंतर अनेक योजना जाहीर केल्या आहेत. किसान क्रेडिट कार्डचा लाभ आणि व्याज सवलतीचा फायदा आता मच्छीमारांनाही मिळणार आहे. ज्या योजना शेतकऱ्यांना लागू आहेत, त्या मच्छीमारांनाही लागू होतील. या सर्वासाठी योग्य प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले असून, येत्या अधिवेशनात ही मदत जाहीर केली जाईल.”

 

या मेळाव्यात संजय बांदेकर, ज्ञानेश्वर खवळे आणि इतर मच्छीमार नेत्यांनी मत्स्य व्यवसाय सुरू न झाल्याने झालेल्या मोठ्या नुकसानीबद्दल पालकमंत्र्यांना माहिती दिली. कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनीही आपले विचार मांडले.

 

या संवाद मेळाव्यास देवगड तालुक्यातील शेकडो मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.