म्हापसा कृषी कार्यालयातर्फे बार्देशच्या शेतकऱ्यांसाठी होडावडा येथे अभ्यास दौरा

मंगेश माणगावकर यांनी दिले विविध उपक्रमांचे प्रात्यक्षिक

सावंतवाडी । प्रतिनिधी : विभागीय कृषी कार्यालय, म्हापसा आणि आत्मा नॉर्थ गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने बार्देश तालुक्यातील महिला व पुरुष शेतकऱ्यांसाठी आंतरराज्य अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यासात्मक दौऱ्यादरम्यान शेतकरी बांधवांनी वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा येथील प्रयोगशील शेतकरी मंगेश माणगावकर यांच्या बागेला भेट देऊन तेथील विविध कृषीविषयक उपक्रमांची प्रत्यक्ष माहिती घेतली.

या भेटीदरम्यान मंगेश माणगावकर यांनी उपस्थितांना गांडुळखत निर्मिती, शेळी पालन, कुक्कुटपालन, रक्षक सापळे आणि चमकणारी अळंबी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शेतीमध्ये कीड नियंत्रणासाठी नैसर्गिकरीत्या मदत करणाऱ्या बेडकांच्या संवर्धनाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले, तसेच बागेत आढळणाऱ्या विविध जातींच्या बेडकांची माहिती शेतकऱ्यांना दिली. शेतकरी बांधव आणि खास करून महिला वर्गासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी, घरगुती पद्धतीने व कमी खर्चात तयार होणारी कृत्रिम अंडी उबवणूक पेटी तयार करण्याचे प्रात्यक्षिक त्यांनी या वेळी दाखवले. दौऱ्याच्या शेवटी शासनातर्फे उपयुक्तता सिद्ध झालेल्या गोकृपा अमृतम् तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून त्याचे शेतीमधील महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.

या प्रसंगी उपस्थित असलेल्या म्हापसा ZAO च्या BTM सौ. पूजा महालकर यांनी कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. या आंतरराज्य अभ्यास दौऱ्यात बार्देश तालुक्यातील एकूण २६ महिला व पुरुष शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत बागेतील विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेतली आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा लाभ घेतला.