पणत्या, आकाशकंदील आणि फराळाच्या खरेदीसाठी तुफान गर्दी

सावंतवाडी । प्रतिनिधी : मांगल्य आणि प्रकाशाचा सण असलेल्या दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीची मुख्य बाजारपेठ पूर्णपणे सजून गेली असून परिसरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली असून, विशेषतः महिला वर्गाचा खरेदीकडील कल अधिक दिसून येत आहे.
बाजारपेठेत विविध आकारांतील व नक्षीकामाच्या मातीच्या पारंपरिक व आधुनिक पणत्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. विक्रेत्यांनी रस्त्याकाठी लावलेल्या स्टॉलवर विविध रंगांच्या पणत्यांचे आकर्षक थर सजवले आहेत.
यासोबतच दुकानांसमोर लटकवलेले रंगीबेरंगी आणि नवनवीन डिझाइनचे आकाशकंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण आपापल्या पसंतीचे आकाशकंदील खरेदी करताना दिसत आहेत.
यंदाच्या दिवाळीत फराळाचे पदार्थ बनवण्याच्या गडबडीतून वेळ वाचवण्यासाठी अथवा घरगुती स्वादाचा आनंद घेण्यासाठी महिला वर्ग मोठ्या संख्येने फराळाच्या स्टॉलकडे वळला आहे. चकली, खुसखुशीत करंजी आणि गोडसर शंकरपाळी यांसारख्या पारंपरिक दिवाळी फराळाच्या विविध स्टॉल्सचे उद्घाटन व विक्री उत्साहात सुरू झाली आहे. या स्टॉल्सवर खरेदीसाठी महिलांची विशेष गर्दी दिसून येत असून, बाजारपेठेला एका अनोख्या उत्सवी व जत्रेचे रूप प्राप्त झाले आहे.













