शालेय पोषण आहाराचा बनावट लॅब रिपोर्ट फेटाळला

सावंतवाडी पंचायत समिती सभेत शिक्षण विभाग धारेवर

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
शालेय पोषण आहारातील निकृष्ट धान्याचा लॅब रिपोर्ट ‘खाणेयोग्य’ आल्यावरून सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक सभेत जोरदार गदारोळ झाला. प्रशासनाने सादर केलेला हा लॅब रिपोर्ट अमान्य करत, हे धान्य पुन्हा शासकीय आणि खासगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याचा ठराव सभापती सुस्मिता जाधव यांनी मंजूर केला. तालुका स्कूल इमारत सभागृहात सभापती सुस्मिता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. या वेळी उपसभापती गौरव मुळीक आणि गटविकास अधिकारी निलेश जाधव उपस्थित होते.

​सभेच्या सुरुवातीला मागील सभेतील इतिवृत्त वाचनादरम्यान शालेय पोषण आहारातील निकृष्ट धान्याचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. मागील बैठकीत सदस्य जितेंद्र गावकर यांनी किडलेले धान्य सभागृहात थेट दाखवून हा मुद्दा मांडला होता. मात्र, गटशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर यांनी हे धान्य लॅब रिपोर्टनुसार चांगले असल्याचा दावा करताच गावकर पुन्हा आक्रमक झाले. “सभागृहात प्रत्यक्ष दाखवलेले धान्य किडलेले असताना कागदावर ते ‘चांगले’ कसे ठरले? तक्रारदाराने स्वतः पुरावा सादर करूनही असा रिपोर्ट कसा येतो? हे किडलेले धान्य मी घरातून आणले नव्हते,” असा सवाल करत त्यांनी अधिकारी आणि कंत्राटदाराच्या संगनमताने बनावट रिपोर्ट तयार केल्याचा थेट आरोप केला. अशा धान्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत असून हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा सदस्यांनी दिला.

उपसभापती गौरव मुळीक यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करत गटशिक्षणाधिकारी शेर्लेकर यांना धारेवर धरले. अखेर सभापती सुस्मिता जाधव यांनी हा लॅब रिपोर्ट अमान्य करत धान्य पुन्हा शासकीय व खासगी लॅबमध्ये तपासले जाईल, अशी ग्वाही दिली.

​मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेवरूनही सभेत जुंपली. हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न सुटल्याबद्दल आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्याची मागणी सदस्य मायकल डिसोजा यांनी केली. यावर उपसभापती गौरव मुळीक यांनी आक्षेप घेत, राजघराण्याने मोफत जागा दिल्यामुळे हा प्रश्न सुटला आहे, त्यामुळे राजघराण्याचा अभिनंदनाचा ठराव घ्यावा, असे सुचवले. सदस्य जितेंद्र गावकर यांनी जागेच्या मालकीबाबत शासनाची की राजघराण्याची ही विसंगत माहिती असल्याने आधी अभ्यास करावा, असे सांगत यात राजकारण करू नये अशी भूमिका घेतली. शेवटी वाद टाळण्यासाठी सभापती जाधव यांनी दोघांचेही अभिनंदन ठराव घेण्याचे निर्देश दिले.

​नाणोस पुलाला तडे गेल्याच्या मुद्द्यावर बोलताना उपअभियंता अजित पाटील यांनी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आल्याचे व तज्ज्ञांच्या अहवालानंतर डागडुजी केली जाईल असे सांगितले. मात्र, उपसभापती मुळीक यांनी डागडुजीऐवजी संपूर्ण नवीन पूल उभारण्याची मागणी केली. त्यानुसार नवीन पूल उभारण्यासाठी निधीची तरतूद करून प्रस्ताव सादर करण्याचा ठराव घेण्यात आला.

​राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. इन्सुली खामदेव नाका येथील पुलाला भेगा पडल्या असून तेथे निकृष्ट मलमपट्टी केली जात आहे, ज्यामुळे सातत्याने अपघात होऊन जीव जात आहेत, असा आरोप सदाशिव राणे व महेश धुरी यांनी केला. झाराप हायवेचे कामही निकृष्ट झाल्याचे सांगत उपसभापती मुळीक यांनी ठेकेदाराला पुढील बैठकीस बोलावण्याचे आणि त्याला काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश दिले.
​इतर महत्त्वाच्या विषयांमध्ये, सावंतवाडी येथे आयोजित ‘महाराजस्व समाधान शिबिरात’ पंचायत समिती सदस्यांना बसण्यासाठी खुर्च्या उपलब्ध नसल्याने लोकप्रतिनिधींचा अपमान झाला, याबद्दल तहसीलदार यांना प्रशासकीय स्तरावरून समज द्यावी, अशी मागणी जितेंद्र गावकर यांनी केली. तालुक्यात ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसवण्याबाबत लवकरच पत्र पाठवून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन गटविकास अधिकारी निलेश जाधव यांनी उदय पारिपत्ते यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिले.

​तसेच, गणेशोत्सव पूर्वतयारी म्हणून रस्त्यावरील खड्डे भरणे व झाडांच्या फांद्या छाटणे, एकात्मिक बाल विकास विभागामार्फत गरोदर माता व कुपोषित बालकांना दिला जाणारा पोषण आहार तपासणे आणि इको सेन्सिटिव्ह झोन नको असलेल्या ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव मंजूर करून घेणे, या विषयांवरही सभेत ठराव करण्यात आले.