दोडामार्ग (सुहास देसाई):दोडामार्ग तालुक्यातील आंबेली येथे आज सकाळी एका भीषण अपघाताची घटना घडली. रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात दुचाकी कोसळल्याने चंदगड तालुक्यातील पार्ले येथील पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
सविस्तर वृत्त असे की,चंदगड तालुक्यातील पार्ले येथील रहिवासी मोतीराम मयेकर आणि सरिता मयेकर हे पती-पत्नी आज सकाळी आपल्या दुचाकीवरून कामानिमित्त गोव्याच्या दिशेने जात होते. आंबेली परिसरात आले असता, समोरून येणाऱ्या एका वाहनाला बाजू देताना मोतीराम यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. दुर्दैवाने, रस्त्याच्या कडेलाच कामासाठी मोठे खड्डे खोदले असल्याने त्यांची दुचाकी थेट त्या खड्ड्यात कोसळली.
*सुरक्षेचे नियम धाब्यावर*
आंबेली परिसरात सध्या रस्त्यांचे काम सुरू आहे. नियमानुसार, जिथे काम सुरू असते किंवा खड्डे खोदलेले असतात, तिथे दिशादर्शक फलक (Signboards) किंवा संरक्षक कठडे (Barricades) असणे अनिवार्य आहे. मात्र, या ठिकाणी अशा कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यामुळेच समोरून वाहन आल्यावर मयेकर दांपत्याला खड्ड्याचा अंदाज आला नाही आणि हा अपघात घडला.
नागरिकांची समयसूचकता
अपघात होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खड्ड्यात अडकलेल्या मयेकर पती-पत्नीला बाहेर काढून त्यांना धीर दिला. घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ रुग्णवाहिका बोलावण्यात आली. जखमींना तातडीने दोडामार्ग येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
*स्थानिकांचा संताप*
*झरेबांबर, पिकुळे सरपंच आक्रमक*
नूतन प. स. सदस्या नेहा गवस यांनी याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात यावी तसेच अशा प्रकारे पुन्हा अपघात होता कामा नये यासाठी आपण रस्त्यावर उतरून जबाबदार अधिकारी यांना धारेवर धरणार असल्याचं ठेकेदार यांना सुनावले
“रस्त्याचे काम करताना प्रवाशांच्या सुरक्षेचा कोणताही विचार केला जात नाहीये. दिशादर्शक फलक नसल्यामुळे बाहेरून येणाऱ्या चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. या अपघाताला पूर्णपणे संबंधित विभाग जबाबदार आहे,” अशी संतप्त भावना पिकुळे सरपंच आपा गवस, झरेबांबर सरपंच अनिल शेटकर व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.













