नाहक टीका कराल तर जशास तसे उत्तर दिले जाईल!

शिवसेना शहरप्रमुख तथा उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा माजी आ. वैभव नाईक व बाबी जोगींना इशारा

 

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील भूमिगत वीजवाहिनीचे काम रखडल्याचा आरोप करणारे व पहे काम माजी आमदार नाईक यांनी मंजूर केला होता असे सांगणाऱ्य उबाठा शहरप्रमुख बाबी जोगी आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर शिवसेना शहरप्रमुख तथा उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी जोरदार पलटवार केला आहे.

 

“बाबी जोगी, गॉगल काढा आणि उघड्या डोळ्यांनी विकासकामे बघा, सगळे स्पष्ट दिसेल,” असा टोला पाटकर यांनी लगावला.

 

भूमिगत वीजवाहिनी प्रकल्पाबाबत नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “हा प्रकल्प का रखडला, हा प्रश्न तुम्ही तुमच्या माजी आमदारांनाच विचारा. त्यांच्या दहा वर्षांच्या अपयशी कारभाराचे हे उदाहरण आहे. आमचे आमदार निलेश राणे मागील दहा वर्षांचा बॅकलॉग भरून काढत असून हा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल,” असे पाटकर म्हणाले.

 

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून भूमिगत वीजवाहिनी योजना राबविली जात असल्याचे स्पष्ट करताना काम लवकर पूर्ण होईल. मात्र, प्रत्येक विकासकामाचे श्रेय घेण्याची खोटी वृत्ती उबाठाने करू नये. यां प्रकल्पाशी माजी आमदार वैभव नाईक यांचा प्रत्यक्ष संबंध नसताना श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला त्यांनी लगावला.

 

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवणसह सिंधुदुर्गात विकासकामे गतिमान झाली आहेत. शहरातही नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी नगरपरिषद प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे.त्यामुळे

विकासकामांवर टीका करण्यापूर्वी वस्तुस्थितीचा अभ्यास करावा. अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा दीपक पाटकर यांनी दिला.