गणरायाला आकार देताना… विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला नवा आकार!

न्यू इंग्लिश स्कूल लांजा येथे पार पडली गणपती मूर्ती बनविणे स्पर्धा

लांजा (प्रतिनिधी) : आनंददायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल लांजा येथे इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गणपती मूर्ती बनविणे स्पर्धा’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेताना मातीला आकार देत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्ती, सर्जनशीलता, कलात्मकता आणि हस्तकौशल्याचा सुंदर आविष्कार घडवून आणला. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या कल्पनेतून साकारलेली गणरायाची मूर्ती ही त्यांच्या कलागुणांची आणि भक्तिभावाची अनोखी अभिव्यक्ती ठरली.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना ‘कलेतून भक्ती आणि भक्तीतून सर्जनशीलता’ याचा सुंदर अनुभव मिळाला. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजले. स्पर्धेच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात उत्साह, आनंद आणि सर्जनशीलतेचे वातावरण निर्माण झाले.

विद्यार्थ्यांच्या ‘चिमुकल्या हातांनी साकारलेला बाप्पा’ हा अनुभव सर्वांसाठीच आनंददायी ठरला.