वेंगुर्ले च्या श्री देव रामेश्वरा ची ‘महाकाल रुपी अर्धनारी नटेश्वर’ रूपात नयनरम्य चंदनपूजा…

श्रावणी दुसऱ्या सोमवारी मंदिर परिसर भक्तीमय

​वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले चे ग्रामदैवत आणि दक्षिण कोकणातील अत्यंत जागृत देवस्थान मानल्या जाणाऱ्या ‘श्री देव रामेश्वर मंदिरात’ श्रावण मासातील दुसरा सोमवार या पवित्र दिनाचे औचित्य साधून श्रींच्या पिंडीवर ‘महाकाल रुपी अर्धनारी नटेश्वर’ रूपातील अतिशय आकर्षक व नयनरम्य चंदनपूजा साकारण्यात आली होती. दर्शनासाठी भाविकांची सकाळ पासूनच गर्दी पाहायला मिळाला.

​श्रावणी सोमवार निमित्त मंदिरात पहाटेपासूनच धार्मिक विधींना सुरुवात झाली. या विशेष पर्वणीवर रामेश्वर चरणी आज १३२ वरदविनायक पूजा बांधण्यात आल्या होत्या. श्रींचे हे अलौकिक व मनमोहक रूप डोळ्यांत साठवण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी दिवसभरात मोठ्या प्रमाणात भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.

​दिवसभर सुरू असलेला हर हर महादेवाचा गजर, ओम नमः शिवाय चा मंत्रोच्चार आणि नामजपाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती.