बांदा तंटामुक्त समिती अध्यक्षपदी ज्ञानेश्वर सावंत यांची निवड

बांदा : प्रतिनिधी 

बांदा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर सावंत यांची ग्रामसभेत बहुमताने निवड करण्यात आली. मावळते तंटामुक्त अध्यक्ष संदेश पावसकर यांचा पदाचा कार्यकाळ संपल्याने नवीन तंटामुक्त समिती या ग्रामसभेत गठीत करण्यात आली.

 

बांदा ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित ग्रामसभेत सरपंच प्रियांका नाईक यांनी नूतन तंटामुक्त गाव समिती गठीत करण्याबाबत सूचित केले. या वेळी साईप्रसाद कल्याणकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयात या पदासाठी अर्ज केला होता. मात्र, ग्रामसभेत ज्ञानेश्वर सावंत यांचे नाव सुशांत पांगम यांनी सूचित केले. त्याला ग्रामसभेत बहुमताने हात उंचावून मतदान केले. त्यामुळे ज्ञानेश्वर सावंत यांची तंटामुक्त अध्यक्ष म्हणून निवड जाहीर करण्यात आली.

 

मावळते अध्यक्ष संदेश पावसकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत यांचे पुष्पगुछ देऊन अभिनंदन केले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी ज्ञानेश्वर सावंत यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.