दोडामार्ग l प्रतिनिधी :तालुक्यातील सासोली पाटये पुनर्वसन येथील रहिवासी शिरीष सत्यवान गवस (३३) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. रेड सॉईल स्टोरी या नावाने सोशल मिडीयावर ते प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनाने सर्वांनाचा एकच धक्का बसला. त्याच्या सासोली पाटये येथे घरी सोशल मीडिया सेलिब्रेटी, राजकीय प्रतिनिधी, अधिकारी वर्ग यांनी अंत्यदर्शन घेतले.
कोरोनाच्या काळात ते आपल्या मूळ गावी सासोली पाटये येथे राहण्यासाठी आले होते. कोरोना काळात शिरीष आणि पूजा गवस यांनी मुंबईतील नोकरी सोडून कोकणात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. ‘रेड सॉइल स्टोरीज’ नावाचे यूट्यूब चॅनेल सुरू केले. त्यांनी मुंबईतील नोकरी सोडून गावात स्थायिक होऊन, तेथील पारंपरिक जीवनशैली, खाद्यसंस्कृती आणि निसर्गाचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या चॅनलच्या माध्यमातून केले. अल्पवधीत त्यांनी या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली.
शिरीष गवस यांच्या अचानक जाण्याने गवस कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, पत्नी, एक वर्षाची मुलगी असा परिवार आहे. निवृत्त नायब तहसीलदार सत्यवान गवस यांचा तो मुलगा होय












