फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल’ ॲप निलंबित करा

 सरपंच विनोद पवार यांची मागणी
 तांत्रिक त्रुटी आणि डिजिटल साक्षरतेचा अभाव
चिपळूण (वार्ताहर) : तांत्रिक समस्या आणि शेतकऱ्यांमधील डिजिटल साक्षरतेचा अभाव असल्याचा दावा करत मिरजोळी ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद पवार यांनी चालू खरीप हंगामासाठी नव्याने सुरू करण्यात आलेले ‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल’ हे मोबाईल ॲप्लिकेशन स्थगित करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेल्या या ॲपमुळे शेतकरी, खत विक्रेते आणि कृषी सेवा केंद्र चालकांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
युरिया आणि डीएपी सारख्या अनुदानित खतांचे आरक्षण आणि वितरण सुव्यवस्थित करण्यासाठी हे ॲप सादर करण्यात आले आहे. सरपंच विनोद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, बुकिंग प्रक्रिया दरम्यान वारंवार तांत्रिक अडचणी येत आहेत. शेतकऱ्यांमधील तांत्रिक ज्ञानाचा आणि डिजिटल साक्षरतेचा अभाव ही समस्या अधिकच वाढवत आहे. तसेच ॲप सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांना आणि विक्रेत्यांना योग्य प्रशिक्षण दिले गेले नाही, असा दावाही त्यांनी केला. खरीप हंगाम हा अत्यंत महत्त्वाचा काळ असून, या काळात खतांची वेळेवर उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. “खत वितरणातील सध्याच्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळणार नाही. याचा कृषी उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो, असे श्री. पवार यांनी सांगितले. चालू खरीप हंगामाच्या कालावधीसाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल’ ॲप तात्काळ प्रभावाने तात्पुरते निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या निलंबनाच्या काळात विक्रेत्यांना भेडसावणाऱ्या समस्या, तांत्रिक त्रुटी आणि व्यावहारिक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सखोल आढावा घ्यावा आणि त्यानंतरच हे ॲप्लिकेशन अधिक कार्यक्षम पद्धतीने पुन्हा सुरू करावे, अशी भूमिका मिरजोळी ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद पवार यांनी मांडली आहे.