मुंबई-गोवा महामार्गावर कापसाल येथे दुचाकी घसरून अपघात; महिला जखमी

चिपळूण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील कापसाल येथील एचपी पेट्रोल पंपासमोर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली ५६ वर्षीय महिला जखमी झाली. रविवारी, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी क्रमांक MH.08 AB 4219 ही चिपळूण येथून सावर्डेच्या दिशेने जात होती. कापसाल येथील एचपी पेट्रोल पंपासमोर चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या साधना नागसेन कांबळे (वय ५६, रा. पाग, चिपळूण) या जखमी झाल्या.
अपघाताची माहिती मिळताच चिपळूण येथील शासकीय विश्रामगृहाजवळ तैनात असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थानची २४ तास अपघात सेवेसाठी कार्यरत असलेली रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेचे चालक सत्यम पवार यांनी जखमी महिलेला त्वरित उपचारासाठी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
महामार्गावर अपघात घडताच तातडीने मदत उपलब्ध झाल्याने जखमी महिलेला वेळेत रुग्णालयात पोहोचविण्यात आले. महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी संस्थेची रुग्णवाहिका सेवा चोवीस तास कार्यरत आहे.