राजापूर (वार्ताहर): येथील राजापूर तालुका कुणबी सह. पतपेढीची ३२ वी वार्षिक अधिमंडळ बैठक रविवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक राजापूर हायस्कूलच्या “कलामंदिर” सभागृहात संस्थेचे चेअरमन प्रकाश भिकू मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत पुढील महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामध्ये दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या वार्षिक अधिमंडळ बैठकीचे इतिवृत्त वाचन करून कायम करणे. ३१ मार्च २०२६ अखेरचा वार्षिक अहवाल व आर्थिक पत्रके स्वीकृत करणे. सन २०२५-२६ अखेर झालेल्या नफा विभागणीस मान्यता देणे आणि लाभांश जाहीर करणे. सन २०२६-२७ सालाकरिता वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी देणे व सन २०२५-२६ मधील खर्चाची माहिती घेऊन मान्यता घेणे.
तसेच ३१ मार्च २०२६ अखेरच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवाल / दोष अहवालाची नोंद घेणे. संचालकांना व त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जांची माहिती घेणे. सन २०२६-२७ सालाकरिता वैधानिक लेखापरीक्षकांची नेमणूक करणे व त्यांच्या मानधनास मान्यता देणे. सन २०२६-२७ सालाकरिता बाहेरील कर्जमर्यादा निश्चित करणे. तसेच सहकार आयुक्त, पुणे यांच्या पूर्वपरवानगीनुसार संस्थेच्या उपविधीत संस्थेचे कार्यक्षेत्र ‘कोकण विभाग’ असे दुरुस्त/बदल करणे. संस्थेच्या नवीन शाखा विस्तारास मान्यता देणे. संस्थेच्या नावाने जमीन, इमारत किंवा इमारतीमधील गाळा खरेदी करण्यास मान्यता देणे. तसेच सभासदांकडून सन २०२५-२६ च्या ताळेबंद व नफा-तोटा पत्रकाबाबत आलेल्या लेखी सूचनांचे वाचन करून नोंद घेणे आदी विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
संस्थेच्या सर्व सभासदांनी या बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यलक्षी संचालक जितेंद्र पाटकर यांनी केले आहे.













