खेड :
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या रत्नागिरी दौऱ्यावर भाजप नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याकडे आम्ही ‘एरियल फोटोग्राफी’सारखं पाहतो, असा टोला खेडेकर यांनी लगावला.
आज सगळं गेलं आणि आता ते येत आहेत; मात्र त्यांच्या हाताला काहीही लागणार नाही, असा दावा करत खेडेकर यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याची खिल्ली उडवली. या दौऱ्यातून कोणताही ठोस राजकीय निष्कर्ष निघणार नसून, पक्षाची पुन्हा मोट बांधण्यासाठीच हा दौरा असल्याचेही त्यांनी म्हटले.
रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते सातत्याने सक्रिय आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचा भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वासही वैभव खेडेकर यांनी व्यक्त केला.
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावरून भाजप आणि ठाकरे गटातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा धार आली असून, आगामी काळात रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.













