अखेर झापडे- कांटे -कोट रस्त्यावरील बेनी नदीवरील पुलाचा प्रश्न लागणार मार्गी

आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नाने पाच कोटी मंजूर,
माजी सरपंच आबा सुर्वे यांच्या प्रयत्नांना यश,

संतोष कोत्रे
लांजा : कोट कांटेसह दशक्रोशीतील गावांना जोडणाऱ्या व गेल्या अनेक वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि शासनाच्या लाल फितीत अडकलेल्या झापडे- कांटे येथील बेनी नदीवरील पूलाच्या कामाला अखेर मंजुरी मिळाली असून आमदार किरण सामंत यांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत. कोट गावचे माजी सरपंच शांताराम तथा आबा सुर्वे यांनी सातत्याने ही मागणी लावून धरली होती. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले आहे
लांजा तालुक्याच्या पश्चिम भागातील कांटे आणि कोट या दोन गावांना जोडणारा बेनी नदीवरील पूल होणे अत्यावश्यक बाब बनली आहे. गेली अनेक वर्षे यासाठी कोट गावचे माजी सरपंच आबा सुर्वे व ग्रामस्थ यांनी सातत्याने मागणी केली आहे. लांजा झापडे कांटे-कोट हा रस्ता तालुक्याच्या पश्चिम विभागातील दोन मोठ्या गावांना जोडणार आहे. तसेच सदरचा रस्ता इतर जिल्हा मार्ग पंधरा असून १६ किमी लांबीचा आहे .बेनी नदीवरील पूल झाल्यास त्याचा फायदा झापडे कांटे कोटसह भडे ,लावगण, खानवली, आगवे, वाडीलिंबू व वाघ्रट, बेनी, हर्चे या गावांना होणार आहे.तसेच या मार्गे पावस- रत्नागिरी हा दळणवळणाचा अतिशय जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. त्याचा फायदा कोट कांटे सह दशक्रोशीतील गावांना होणार आहे. तसेच या मार्गे पावस रत्नागिरी हा दळणवळणाचा अतिशय जवळचा मार्ग देखील उपलब्ध होणारा असून त्याचा थेट फायदा दशक्रोशीतील गावांना होणार आहे
सदरचा नियोजित पूलाचा सर्वे व अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दोन ते तीन वेळा करण्यात आलेला होता. मात्र पूल होणे बाबत संबंधीत विभागाकडे व शासनाकडे सातत्याने पाठपुरावा व पत्रव्यवहार करून देखील अद्यापही हा पूल मंजूर झालेला नव्हता . त्यामुळे झापडे कांटे कोट दशक्रोशीतील ग्रामस्थांची पुलाबाबत असणारी रास्त मागणी लक्षात घेऊन या पुलाला तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी माजी सरपंच शांताराम सुर्वे यांनी केली होती .यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. तसेच पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत,माजी आमदार राजन साळवी यांना देखील निवेदन सादर केली होती.
या पुलासाठी कोट गावचे माजी सरपंच शांताराम तथा आबा सुर्वे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करतानाच वेळोवेळी यासाठी आंदोलनाची भूमिका देखील घेतली होती. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आले असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि विद्यमान आमदार किरण सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर या पुलाच्या कामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे लवकरच पुलाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने माजी सरपंच शांताराम तथा आबा सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य हंसराज तथा राजू सुर्वे आणि कोट दशक्रोशीतील ग्रामस्थांनी आमदार किरण सामंत यांचे विशेष आभार मानले आहेत