‘शब्द नव्हे, शस्त्र’ पुस्तकाचा ३० ऑगस्ट रोजी प्रकाशन सोहळा विविध मान्यवरांची उपस्थिती

चिपळूण (प्रतिनिधी) : कोकणातील वरिष्ठ पत्रकार सतीश कदम लिखित व संपादीत ‘शब्द नव्हे शस्त्र ‘ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम येथील ब्राह्मण सहायक संघ कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थिती संपन्न होणार आहे.
गेली ३५ वर्ष पत्रकार म्हणून कार्यरत असणाऱ्या सतीश कदम यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध वृत्तपत्रांमध्ये वरिष्ठ पदावर काम केले आहे. ज्यामध्ये दैनिक सागर, ‘ दैनिक सकाळ, दैनिक पुढारी, दैनिक तरुण भारत यासह हिंदी राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांमध्येही न्यूज ब्युरो चीफ व आवृत्ती संपादक म्हणून काम केलेले आहे. तसेच गेली २५ वर्ष ते स्वतःचे साप्ताहिक कोकण एक्सप्रेस वृत्तपत्रचे संपादक म्हणून जबाबदारी हाताळात असून हे वृत्तपत्र प्रकाशित करत आहेत. दैनिक तरुण भारतमध्ये संपादकीय प्रमुख म्हणून काम करत असताना त्यांनी ‘वाशिष्ठीच्या काठावरून’ हे सदर अनेक वर्ष लिहले. हे सदर वाचकप्रिय झाले व त्यानंतर त्यांनी ‘ साप्ताहिक कोकण एक्सप्रेस’ मधून संपादक म्हणून जबाबदारी हाताळत असताना, राज्यपातळीपासून स्थानिक विषयांवरील अनेक अग्रलेख प्रकाशित केले आहेत.
यातील गेल्या दहा वर्षातील निवडक अग्रलेखांचे संकलित पुस्तकाचे ‘शब्द नव्हे शस्त्र ‘ या शीर्षकाखाली ३०३ पानांचे पुस्तक पुणे येथील संस्कृती प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक ३० ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता ब्राह्मण सहायक संघ येथील हॉलमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शेखर निकम, आमदार प्रमोद जठार, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार रमेश कदम, प्रसिद्ध कादंबरीकार व लेखक डॉ. तानाजी चोरगे, प्रसिद्ध साहित्यिक प्रकाश देशपांडे, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, संस्कृती प्रकाशन पुणे संस्थेच्या प्रकाशक सुनिताराजे पवार, ब्राईट ओरिजिन मीडिया प्रा.लि.चे संचालक शेखर जैन यांचेसह विशेष अतिथी म्हणून दैनिक सागरच्या संपादक श्रीमती शुभदा जोशी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला शहरातील नगरसेवक तसेच साहित्य व सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी एनडीटीव्ही मराठी वृत्तवाहिनीच्या निवेदिक व मुक्त लेखिका ऋतुजा कदम या उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन ‘कोकण एक्सप्रेस ‘ परिवारातर्फे करण्यात आले आहे.