मंडणगड:
बँक ऑफ इंडियाची केवायसी (KYC) लिंक अपडेट करण्याच्या बहाण्याने मोबाईलवर पाठवलेल्या अज्ञात APK लिंकवर क्लिक करणे एका शेतकऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. पालेकोड (ता. मंडणगड) येथील सुनील धोंडू माळी (वय ४७) यांच्या व्हॉट्सॲपवर अशोक नटे यांच्या मोबाईल नंबरवरून एक बँक ऑफ इंडियाच्या KYC ची लिंक आली होती. ही लिंक उघडून प्रक्रिया केली असता, २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२:३० ते २२ ऑगस्ट रोजी पहाटे ४:०० वाजेच्या दरम्यान त्यांच्या बँक खात्यातून तब्बल २ लाख ७६ हजार रुपये (दोन लाख शहात्तर हजार रुपये) ऑनलाईन चोरून फसवणूक करण्यात आली आहे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर सुनील माळी यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याविरोधात फिर्याद दिली असून, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.













