क्रॉपसॅप शेती शाळेत कीड-रोग व्यवस्थापन व जैविक निविष्ठांबाबत मार्गदर्शन
शिरगांव (प्रतिनिधी) : कीड व रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत देवगड तालुक्यातील नाद येथे मंगळवारी भात पीक शेती शाळेचा चौथा वर्ग घेण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना भात पिकातील कीड व रोग व्यवस्थापनाबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्डशीटचा वापर करून स्टिकी ट्रॅप्स (चिकट सापळे) तयार करणे, तसेच फेरोमोन ट्रॅप्स (कामगंध सापळे) व पक्षी थांबे तयार करून प्रत्यक्ष भात पीक क्षेत्रात लावण्यात आले. तसेच आयपीएम (एकात्मिक कीड व्यवस्थापन), आयएनएम (एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन) आणि रेसा (भात पीक परिसंस्था अभ्यास) अंतर्गत विविध निरीक्षणे नोंदविण्यात आली.तसेच जैविक निविष्ठांमध्ये गोकृपा अमृत, जीवामृत तसेच दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिकही यावेळी करून दाखविण्यात आले. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून या निविष्ठांची निर्मिती व वापराबाबत माहिती घेतली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी श्रीमती आरती पाटील, मंडळ कृषी अधिकारी शिरगाव डॉ. बापूसाहेब लांबाडे, होस्ट फार्मर सीआरपी श्रीमती सुमन साटम, सहाय्यक कृषी अधिकारी कुवळे अमोल इढोळे, सहाय्यक कृषी अधिकारी महाळुंगे सचिन पडघान यांच्यासह महिला शेतकरी उपस्थित होत्या.













