गणेश चतुर्थीपूर्वी रस्ता दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
शिरगांव (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील चाफेड-भोगलेवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय ते पिंपळवाडी या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दरवर्षी याच खड्डेमय रस्त्यावरून बाप्पांचे आगमन होत असून, यंदा तरी गणेशमूर्तींचे सुखरूप आगमन व्हावे यासाठी गणेशभक्तांकडून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
पिंपळवाडी येथे गणेशमूर्तीची शाळा असल्याने दशक्रोशीतील असंख्य गणेशभक्त गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी येथे येतात. मात्र, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने गणेशमूर्ती वाहनातून नेताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. ग्रामस्थांनी ग्रामसभेत हा विषय मांडला असता, सरपंच साहिल पांचाळ यांनी गणेश चतुर्थीपूर्वी ग्रामनिधीतून या मार्गावरील खड्डे बुजविण्यात येणार असल्याची माहितीu दिली.













