कोंड्ये गावात विजेचा खेळ खंडोबा, पाण्यावाचून‌ लोकांचे हाल

खंडित विजेचा प्रश्न मार्गी न लावल्यास प्रसंगी जनआंदोलन – सरपंच चंदुरकर यांचा इशारा

लांजा (प्रतिनिधी ): लांजा शहरा नजीकच्या कोंड्ये गावामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा खेळ खंडोबा सुरू आहे.‌ सातत्याने गायब होणाऱ्या विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. काही वेळा तर
सलग चार-चार दिवस वीजपुरवठा खंडित होतो.‌ त्यामुळे हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अन्यथा या विरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच
मनोज चंदुरकर यांनी दिला आहे.
याबाबत महावितरणच्या उपअभियंत्यांना लेखी निवेदन देऊन गावातील वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, महावितरणच्या दुर्लक्षामुळे कोंडये गावातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनली असून, ग्रामस्थांना अनेक दिवस अंधारात राहावे लागत आहे.
तर काही वेळेला नळ पाणी योजना ठप्प पडत असल्याने ग्रामस्थांना अंधारात राहण्यासोबतच पाण्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागत आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये महावितरणविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर समस्या सोडविण्यासाठी संबंधित वायरमन किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, अनेक वेळा संबंधित कर्मचारी फोन उचलत नाहीत. फोन उचलला तरी नागरिकांना अरेरावीची किंवा समाधानकारक नसलेली उत्तरे दिली जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच कर्मचारी संख्या कमी असल्याचे कारण देऊन समस्या सोडविण्यास टाळाटाळ केली जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, महावितरणने कोंडये गावातील वीजपुरवठ्याच्या समस्येकडे तातडीने लक्ष न दिल्यास आणि गणेशोत्सवापूर्वी हा प्रश्न मार्गी न लावल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सरपंच मनोज चंदूरकर यांनी दिला आहे.