गुहागर प्रतिनिधी:
गुहागर तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, गुहागर अंतर्गत बीट तळवलीमधील तळवली बौद्धवाडी अंगणवाडी केंद्रात ‘नवचेतना’ व ‘आधारशिला’ उपक्रमांतर्गत बालक व पालकांचा स्वागत मेळावा उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उदघाटन एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, गुहागरच्या पर्यवेक्षिका कांचन गुरव यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.त्यानंतर अंगणवाडीतील बालक व पालकांचे स्वागत करण्यात आले. ‘नवचेतना’ व ‘आधारशिला’ या उपक्रमांची माहिती देताना कांचन गुरव यांनी पूर्व प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व, आरोग्य व स्वच्छता तसेच बालकांचा सामाजिक, मानसिक, शारीरिक, बौद्धिक व भाषिक विकास याबाबत मार्गदर्शन केले. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
अंगणवाडी सेविकांच्या वतीने पर्यवेक्षिका कांचन गुरव, तसेच उपस्थित पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला पत्रकार उत्तम पवार,तळवली बीटमधील 41 अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस, पालक तसेच गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका मानसी कुळे यांनी केले, तर श्रद्धा बेलवलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.












