सावंतवाडी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी पाळला शब्द : ग्रामस्थांनी मानले आभार
सावंतवाडी:सावंतवाडी-कोलगाव हद्दीतील आयटीआयजवळील पाणवठ्याच्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून साचलेल्या कचऱ्याच्या गंभीर समस्येतून अखेर परिसरातील नागरिकांची सुटका झाली आहे. सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी दिलेल्या आश्वासनानुसार तात्काळ पावले उचलत नगरपालिकेची कचरा गाडी आणि कर्मचारी पाठवून संपूर्ण परिसर कचरामुक्त केला आहे. नगराध्यक्षांनी दाखवलेली तत्परता आणि ‘बोले तैसा चाले’ या उक्तीप्रमाणे आपला शब्द पाळल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमधून त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत असून सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
कोलगाव हद्दीवरील या परिसरात काही हॉटेल व्यावसायिक आणि स्थानिक रहिवाशांकडून मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याने अस्वच्छता निर्माण झाली होती. कचऱ्याच्या साम्राज्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता, तसेच मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या वावरामुळे ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना आणि स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते समीर धुरी यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी नगराध्यक्ष सौ. श्रद्धाराजे भोसले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थितीचे गांभीर्य पटवून देणारे निवेदन सादर केले होते आणि तातडीने स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी केली होती.
समीर धुरी यांच्या या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत नगराध्यक्ष सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता आणि पुढील दोन दिवसांत योग्य ती कार्यवाही करून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार त्यांनी त्वरित संबंधित यंत्रणेला निर्देश देऊन नगरपालिकेची कचरा गाडी व कर्मचारी पाठवून तेथील साचलेला कचरा पूर्णपणे हटवला.
सामाजिक कार्यकर्ते समीर धुरी यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे आणि नगराध्यक्षांच्या तत्पर निर्णयामुळे कोलगाव-नाईकबाग परिसरातील कचऱ्याची समस्या सुटल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकत उभयतांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. या कारवाईनंतर, परिसर भविष्यातही असाच स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी नागरिकांनी उघड्यावर कचरा न टाकता प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही या प्रसंगी करण्यात आले आहे.













