तिलारी खोऱ्यातून हाकललेला ‘ओंकार’ हत्ती पुन्हा दोडामार्गात!

आडाळीत दुकानात शिरकाव, तर कळणे नदीत मांडला ठिय्या

​वन कर्मचाऱ्यांना काठावर करावी लागली तासन्‌तास प्रतीक्षा; हत्तीला मूळ कळपात पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू

​दोडामार्ग | सुहास देसाई :

तिलारी खोऱ्यातून भटकत गोव्यात गेलेल्या ‘ओंकार’ नावाच्या हत्तीला पुन्हा मूळ कळपात सामील करण्यासाठी वन विभागाच्या पथकाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, माघारी आणत असताना या हत्तीने आडाळी येथे थेट एका दुकानात शिरकाव करत मोठ्या प्रमाणावर धांदल उडवून दिली. या घटनेनंतर त्याने मोर्चा कळणे नदीकडे वळवत नदीच्या पात्रात उतरून बराच वेळ मनसोक्त डुंबत ठिय्या मांडल्याने वन कर्मचाऱ्यांना काठावर ताटकळत राहावे लागले.

तिलारी परिसरातून भरकटलेला हा हत्ती सीमा पार करून गोव्यात गेला होता. त्याला तिथून हुसकावून पुन्हा तिलारी खोऱ्यातील मूळ कळपात पाठवण्यासाठी वन विभागाचे पथक सतत पाठपुरावा व प्रयत्न करत आहे. मात्र, दोडामार्ग तालुक्यात प्रवेश केल्यानंतर आडाळी येथे हत्तीने थेट एका दुकानात प्रवेश केल्याने काही काळ घबराट व उडाली.

​दुकानातील या गोंधळानंतर हत्तीने आपला प्रवास पुढे सुरू ठेवत कळणे नदी गाठली. तेथे नदीच्या पात्रात उतरून हत्तीने बराच वेळ पाणी उडवत आनंद लुटला व ठिय्या मांडला. हत्ती नदीतून बाहेर पडत नसल्याने आणि सुरक्षित मार्ग काढायचा असल्याने मागावर असलेल्या वन कर्मचाऱ्यांना तासन्‌तास नदीच्या काठावर थांबून प्रतीक्षा करावी लागली.

​सध्या वन विभागाचे पथक हत्तीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असून, त्याला कोणतीही इजा न पोहोचवता आणि मानवी वस्तीला धोका निर्माण न होऊ देता मूळ कळपात सुखरूप सामील करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.