चिपळूण (प्रतिनिधी):– तालुक्यातील मार्गताम्हणे एज्युकेश सोसायटी संचलित डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय मार्गताम्हाने मध्ये मराठी विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने आयोजित श्रावणसरी हा कार्यक्रम नुकताच पार पाडला. मराठी विभाग प्रमुख आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक विक्रांत टेरवकर यांच्या संकल्पनेतून लिखित- दिग्दर्शित आणि पार्श्वसंगीतबद्ध असा हा कार्यक्रम होता. नृत्य आणि अभिनय यांचा सुरेख संगम या कार्यक्रमात होता.
पाश्चिमात्य अभ्यासक कोकणातील श्रावणातले सण जाणून घेण्यासाठी कोकणातील एका गावात येऊन गाव प्रमुखकडून ते सण जाणून घेतो आणि अधिक इच्छेखातर पुढच गणेशोत्सव सण पण पाहून जातो आणि इथल्या मातीशी नाळ जोडून राहतो. अशा संकल्पनेवर आधारलेली ही कलाकृती होती.
कोकणातली सकाळ, नागपंचमी, श्रावण सोमवार, मंगळागौर, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, दहीहंडी, गणपती आगमन,जाखडी, टिपरी नृत्य, भजन, आरती, गणेश विसर्जन असा सोहळा रंगमंचावर सादर करण्यात आला. जवळपास तीन तास चाललेला हा कार्यक्रम प्रेक्षकांनी जवळून अनुभवला.
महाविद्यालयातील सतरा विद्यार्थी या कलाकृतीत सहभागी होते. बावन्न विद्यार्थी हा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित होते. संचालक भरत देवरुखकर यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन वाद्यपूजनाने केले. वरिष्ठ लिपीक राजेंद्र विचारे, वसंतराव भागवत माधमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक विनोद पवार, सेमी इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ. सोमण , विद्यसंकुळातील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्गाने सुद्धा या कार्यक्रमाचा आनंद घेतला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
संचालक भरत देवरूखकर यांनी सुरुवातीला या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देताना आपल्या सण – परंपरेचं महत्व सांगितलं. पुरुषांची ओळख असलेल्या जाखडी नृत्याच प्रातिनिधिक रूप विद्यार्थीनिनी या कलाकृतीत दाखवले हे या कार्यक्रमाच आगळवेगळ रूप होतं.
संस्था अध्यक्ष मधुकर चव्हाण यांनी या कार्यक्रमाच भरभरून कौतुक केलं. या बरोबरच संस्थेच्या परिसरात सुद्धा या कार्यक्रमाच कौतुक होत आहे. व्यावसायिक रंगमंचावर सादर केला जाईल इतकी सुंदर कलाकृती आहे अशी स्तुती प्रेक्षक वर्गातून या कार्यक्रमाबद्दल केली जात आहे.
मराठी विभाग प्रमुख आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक विक्रांत टेरवकर, सांस्कृतिक विभाग सह समन्वयक प्राध्या. सुप्रिया वाघे आणि मराठी विभागाच्या प्राध्या. शुभांगी नाकील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.













