परभणीतील मेळाव्यावरून जरांगे पाटील यांनी गैरसमज करून घेऊ नये उद्योगमंत्री उदय सामंत

पुढील २४ तासांत निर्णय; लवकरच भेट घेणार

राजापूर प्रतिनिधी :”परभणी येथील शिवसेनेचा शेतकरी व युवा संवाद मेळावा हा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला काउंटर करण्यासाठी किंवा मराठा आरक्षणात अडथळा निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आला नव्हता,” असे स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. हा कार्यक्रम दोन महिन्यांपूर्वीच नियोजित होता. त्यामुळे जरांगे यांनी कोणाच्याही सांगण्यावरून कोणताही गैरसमज करून घेऊ नये,” असे आवाहनही त्यांनी केले.
राजापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, परभणी येथील मेळावा ७ जुलै रोजी होणार होता. मात्र, तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. जरांगे पाटलांचे उपोषण सुरू असताना हा मेळावा घेण्यात आल्यामुळे जरांगे यांचा गैरसमज झाला असला, तर तो साफ चुकीचा आहे. खासदार संजय जाधव यांनी मनोज जरांगे यांना फोन केला, तेव्हा मेळाव्याच्या ठिकाणी हजारो लोक उपस्थित होते. त्यामुळे शिंदे साहेबांना हा मेळावा पूर्ण करावा लागला. या मेळाव्यातून मराठा समाजाला कमी लेखण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मला परभणी एमआयडीसीच्या कामासंदर्भात फोन केला होता. त्या संभाषणादरम्यान त्यांनी मला विशेषतः सांगितले की, ‘आंदोलने होत राहतील आणि मागण्याही मान्य होतील, परंतु मनोज जरांगे यांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे.’ आंदोलनाला बसलेल्या नेत्याच्या प्रकृतीची एवढी संवेदनशीलतेने काळजी घेणारे नेतृत्व म्हणजे शिवसेना आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांचे भाषण सुरू असताना एका आंदोलकाने घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता, उपमुख्यमंत्री यांनी तत्काळ मध्यस्थी करत ‘तो माझाच माणूस आहे, त्याच्यावर कोणतीही कारवाई करू नका’ असे आदेश दिले. ही संवेदनशीलता केवळ शिंदे साहेबच दाखवू शकतात.

पुढील २४ तासांत निर्णय; लवकरच भेट घेणार

मराठा आरक्षणाच्या आणि जरांगे यांच्या मागण्यांच्या संदर्भात शासन सकारात्मक असून, पुढच्या २४ तासांत यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल. जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी मी स्वतः, प्रसाद लाड आणि इतर नेते त्यांच्या सतत संपर्कात आहोत. मी स्वतः उद्या किंवा परवा मनोज जरांगे यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.

गैरसमजातून वाईट बोलणे अयोग्य

“माझे आणि जरांगे पाटलांचे संबंध राजकारणाच्या आणि आंदोलनाच्या पलीकडचे आहेत,” असे सांगत मंत्री सामंत म्हणाले, “कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा गैरसमजातून एकनाथ शिंदे अथवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वाईट बोलणे योग्य नाही. शिंदे साहेबांची भूमिका कायम मराठा समाजाला आरक्षण देण्याचीच राहिलेली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण अडचणीत यावे, अशी भूमिका ते कधीही घेणार नाहीत, याची खात्री जरांगे यांनी बाळगावी.”