कोकणातील प्रवाशांना दिलासा; सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक स्थानकांवर थांबे
कणकवली : प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन अहमदाबाद जंक्शन–मंगळुरू जंक्शन–अहमदाबाद जंक्शन या साप्ताहिक विशेष रेल्वेच्या सेवेला मुदतवाढ देण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. ट्रेन क्रमांक ०९४२४ अहमदाबाद–मंगळुरू आणि ०९४२३ मंगळुरू–अहमदाबाद या साप्ताहिक विशेष गाड्या आता अनुक्रमे २७ व २८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत धावणार आहेत.
ट्रेन क्रमांक ०९४२४ अहमदाबाद–मंगळुरू ही दर शुक्रवारी धावते. ही गाडी ४ सप्टेंबरपासून १६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत विद्यमान पावसाळी वेळापत्रकानुसार धावणार असून, त्यानंतर २३ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत बिगरपावसाळी वेळापत्रकानुसार धावेल. अहमदाबादहून ही गाडी दर शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक ०९४२३ मंगळुरू–अहमदाबाद दर शनिवारी धावणार आहे. ५ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरपर्यंत ही गाडी पावसाळी वेळापत्रकानुसार, तर २४ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत बिगरपावसाळी वेळापत्रकानुसार धावेल. मंगळुरूहून ही गाडी रात्री १०.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे २.१५ वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल.
या रेल्वेला नाडियाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमळी, मडगाव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुरुडेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड बायंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुलकी आणि सुरतकल या स्थानकांवर थांबे आहेत.
या गाडीच्या सेवेला मिळालेली मुदतवाढ विशेषतः कोकणातील प्रवाशांसाठी महत्त्वाची असून, मुंबई, गुजरात तसेच कर्नाटककडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. प्रवाशांनी गाडीचे अद्ययावत थांबे व वेळापत्रक तपासून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.













