लांजा येथे पार पडली भव्य आंतर शालेय मॅरेथॉन स्पर्धा
लांजा( प्रतिनिधी): यावर्षी मॅरेथॉन स्पर्धेला लाभलेला स्पर्धकांचा प्रतिसाद लक्षात घेता पुढील वर्षी लांजा येथे होणारी मॅरेथॉन स्पर्धा ही भव्य दिव्य स्वरूपाची म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा ठरेल, अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी आज रविवारी लांजा येथे केली.
श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी, पाली संचलित डी.जे.सामंत इंग्लिश मीडियम, लांजा यांच्या वतीने लांजा तालुका मर्यादित भव्य आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रविवार ३० ऑगस्ट रोजी करण्यात आले होते, यावेळी पालकमंत्री उदय सामंत बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर उद्योजक रवींद्र उर्फ आण्णा सामंत, आमदार किरण सामंत, न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये, लांजाच्या नगराध्यक्षा सावली कुरूप, पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, महसूल नायब तहसीलदार सुरेंद्र भोजे, जि.प.माजी अध्यक्ष जगदीश राजापकर, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, पुढच्या वर्षी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी जे काही किट स्पर्धेच्या दृष्टीने आवश्यक असेल ते देखील उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येईल. विशेषतः आम्ही ड्रग्स मुक्त रत्नागिरी जिल्हा अशी मोहीम सुरू केली आहे. सध्या लहान मुले देखील ड्रग्सच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे माझी उपस्थित पालकांना कळकळीची विनंती आहे की, या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे. कारण आपल्या सगळ्यांपुढे सगळ्यात मोठे संकंट ड्रग्स सेवनचे आहे. मुलांमध्ये होणाऱ्या ड्रग्सच्या सेवनावर प्रतिबंध करण्यासाठी राजकारण न करता एकत्र आले पाहिजे. राजकारण होत राहील परंतु पुढच्या पिढीला सांभाळायचे असेल आणि पुढच्या पिढीला योग्य मार्गदर्शन करायचे असेल तर अशा स्पर्धांमधून जनजागृतीचे विषय जिल्ह्यात तथा महाराष्ट्रात झाले पाहिजेत.
लांजा तालुक्यात प्रथमच पार पडलेल्या या स्पर्धेला शेकडो विद्यार्थ्यांसह क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा प्रारंभ सकाळी ६.४५ वाजता सामंत ग्राऊंड, सारस्वत वसाहत, झापडे-कांटे रोड, लांजा येथून झाला. स्पर्धेत विविध वयोगटातील मुले व मुली सहभागी झाल्या होत्या. यामध्ये १२ वर्षे, १४ वर्षे आणि १६ वर्षांखालील गटांसाठी अनुक्रमे १ किमी, २ किमी आणि ३ किमी अशा अंतरांच्या स्पर्धा पार पडल्या. तर या स्पर्धेत तीनही गटात प्रथम पाच विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले. तसेच सहभागी स्पर्धकांनाही सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत विविध गटांमध्ये १२ वर्षे मुले वयोगटात प्रथम सनी देओल पासवान, द्वितीय सत्यम सचिन पवार, तृतीय साहिल सोमनाथ चव्हाण तसेच १२ वर्षे मुली वयोगटात प्रथम श्रावणी संतोष मोरे, द्वितीय आरुषी अमोल गुरव, तृतीय आराध्या विद्याधर करंबेळे तर १४ वर्षे मुले वयोगटात प्रथम बॉबीदेओल राजू पासवान, द्वितीय आर्यन रोहीत वर्मा, तृतीय आदित्य अजय माटल तसेच १४ वर्षे मुली वयोगटात प्रथम आराध्य गुरुदास माने, द्वितीय स्वप्ना संतोष मोरे, तृतीय आर्या विजय टोळे तर १६ वर्षे मुले वयोगटात प्रथम स्वयं संजय चाचे, द्वितीय सोहम सहदेव करळकर, तृतीय प्रसाद अनिल पाष्टे व १६ वर्षे मुली वयोगटात स्वरा संजय उपशेट्ये, द्वितीय मानवी सूर्यकांत बंडबे, तृतीय सिद्धी संजय मोसमकर आदी विजेता ठरले. दरम्यान, विजेत्या ठरलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रक्कम व मेडल देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डि.जे.सामंत इंग्लिश मीडीयमच्या व्यवस्थापकांनी विशेष परिश्रम घेतले.













