राजापूरचे नगर परिषदेचे माजी नगरसेवक अ. रहिमान उर्फ कुतुबुद्दीन मापारी यांचे निधन

राजापूर (प्रतिनिधी): शहरातील मापारीवाडा येथील प्रतिष्ठीत नागरिक व राजापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक अब्दुलरहिमान उर्फ कुतुबुद्दीन अ. अजिज मापारी (७८) यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने मापारीवाडा येथील रहाते घरी निधन झाले. शहरातील प्रसिध्द व्यापारी व बज्मे उर्दु अदब संस्थेचे उपाध्यक्ष कमाल मापारी यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.
अब्दुलरहिमान मापारी हे कुतुबुद्दीन या टोपण नावाने सर्वांना परिचित होते. राजापूरच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकिय क्षेत्रात त्यांचा कायमच सक्रिय सहभाग असे. राजापूर नगर परिषदेत त्यांनी २० वर्षे नगरसेवक म्हणून काम केले. यावेळी त्यांनी आपल्या भागातील तसेच शहरातील विविध प्रश्नांना न्याय दिला. राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव म्हणूनही त्यांनी दिर्घकाळ काम पाहिले. तर जमातुल मुस्लीमीन वरचावाडा जमतीचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले. शैक्षणिक व सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान होते.
एक शांत, संयमी व मितभाषी व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख होती. हिंदू मुस्लीम समाजात त्यांचे स्नेहपुर्ण असे संबध होते. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही ते परिचित होते. वृध्दापकाळामुळे गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती, त्यांच्यावर उपचारही सुरू होते. रविवारी रात्री अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले व त्यांतच त्यांची प्राणज्योत मालावली.
त्यांच्या पश्चात अशफाक व मकसूद असे दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर सोमवारी सकाळी त्यांच्यावर तालीमखाना कबरस्तान येथे दफनविधी करण्यात आले.