गुरुमाऊली शोभाताई यांच्या पावन उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
सावंतवाडी :येथील बाजारपेठेतील काडसिद्धेश्वर भवन येथे परम पूज्य श्री. काडसिद्धेश्वर महाराजांच्या शिष्या गुरुमाऊली शोभाताई यांच्या पावन उपस्थितीत मंगळवारी, १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता श्रावण सप्ताह सांगता व दासबोध समाप्ती कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने दिवसभरात विविध आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सकाळी काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर भजन आणि प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी ७.३० वाजता कारिवडे पेडवेवाडी येथील ‘हेळेकर प्रासादिक भजन मंडळ’ यांच्या भजनाचा विशेष कार्यक्रम रंगणार आहे.
तसेच या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच बुधवारी २ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता वजराट येथील भोंसले निवासस्थानी दासबोध समाप्तीचा कार्यक्रम पार पडणार आहे. या सर्व धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसादाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.













