ग्रामीण भागातील नेटवर्क समस्येमुळे ई-पीक पाहणीला अडथळा

शिरगांव (प्रतिनिधी) :           यावर्षी ई-पीक पाहणी मोहिमेच्या कामासाठी सहाय्यकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्कची समस्या असल्याने डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) ॲपवर पीक पाहणीच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत.

काही मोबाईलमध्ये डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) ॲप सपोर्ट होत नसल्यानेही पीक पाहणीच्या कामावर परिणाम होत आहे. त्यातच मोबाईल ॲपच्या वापराबाबत आवश्यक प्रशिक्षण अद्याप देण्यात आलेले नसल्याने प्रत्यक्ष सर्वेक्षण करताना सहाय्यकांना तांत्रिक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे.

पीक पाहणीच्या कामासाठी सहाय्यकांना तुटपुजे मानधन देण्यात येत आहे.

सहाय्यकांना गावातील सर्वे नंबर विभागून देण्यात आले असल्याने संबंधित सर्वे नंबरमधील पीक पाहणी निर्धारित कालावधीत पूर्ण करणे अपेक्षित आहे. मात्र, शेतशिवारात नेटवर्क उपलब्ध नसल्याने नोंदणी व माहिती अपलोड करण्यासाठी नेटवर्क असलेल्या ठिकाणी जावे लागत असल्याने वेळेचा अतिरिक्त खर्च होत आहे.

ई-पीक पाहणीची नोंद वेळेत न झाल्यास शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे ई-पीक पाहणीची प्रक्रिया सुरळीत आणि अडथळामुक्त होणे गरजेचे आहे.

तरी शासनाने ई-पीक पाहणीसाठी जुन्या पद्धतीप्रमाणे शेतकऱ्यांना स्वतः लॉगिन करून आपल्या पिकांची नोंद करण्याची सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.