तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी
बांदा : प्रतिनिधी
असनिये येथे गावठी बनावटीची बंदूक आणि ९ जिवंत काडतुसे जप्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही संशयितांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या गुन्ह्यात बांदा नजिकच्या गावातील आणखी दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली असल्याची माहिती आहे. त्यांना ताब्यात घेण्यासाठी बांदा पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
सावंतवाडी पोलिसांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बांदा पोलिसांनी असनिये-वायंगणवाडी येथे छापा टाकून जयेंद्र अनिल सावंत (वय २७) याला गावठी बंदूक व ९ जिवंत काडतुसांसह रंगेहात पकडले होते. त्याच्या चौकशीत ही बंदूक प्रसाद प्रभाकर कुबल (४३, रा. नेतर्डे) याने दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी प्रसाद कुबल याला ताब्यात घेतले असता, त्याने राजू गोपाळ पाटील (वय ३३, रा. कासारवर्णे, पेडणे-गोवा) यालाही बंदूक पुरवल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांनाही बेड्या ठोकल्या.
तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी जयेंद्र सावंत आणि प्रसाद कुबल यांच्या घरांची झडती घेतली. मात्र तेथे अन्य कोणताही आक्षेपार्ह मुद्देमाल आढळला नाही. त्यानंतर मुख्य पुरवठादार प्रसाद कुबल याला सावंतवाडी-माजगाव येथील बंदूक तयार करणाऱ्या कारखान्यात नेऊन पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली. त्याने ही बंदूक नेमकी कशी मिळवली आणि तिची वाहतूक कशी केली, याबाबत घटनाक्रमाची पडताळणी करण्यात आली.
हस्तगत केलेली ९ जिवंत काडतुसे नेमकी कुठून आणली, याचे गूढ अद्याप कायम आहे. या रॅकेटचे जाळे कुठपर्यंत पसरले आहे, याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अतिरिक्त कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने तिघांच्या पोलीस कोठडीत एका दिवसाची वाढ केली आहे. सध्या संशयितांच्या मोबाईल रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू असून, गोवा तसेच स्थानिक परिसरातील अन्य कोणाला अशा बेकायदा बंदुका पुरवण्यात आल्या आहेत का, याचा कसून शोध घेतला जात आहे.
निष्पन्न झालेल्या नवीन दोन संशयितांच्या घरी पोलीस पथके जाऊन आली आहेत. हे दोघे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर या रॅकेटमधील आणखी मोठी नावे समोर येऊन नव्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.












