सावंतवाडी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अव्वल मानांकित आंतरराष्ट्रीय रेटेड बुद्धिबळपटू, राज्य पंच तथा प्रशिक्षक बाळकृष्ण पेडणेकर यांच्या विशेष बुद्धिबळ मार्गदर्शन शिबीराला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. सावंतवाडी येथील पाटणकर वाड्यातील मुक्ताई ॲकेडमीच्या प्रशिक्षण केंद्रात या शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचा फायदा जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला आणि मालवण परिसरातील एकूण सव्वीस विद्यार्थ्यांनी घेतला.
या शिबीराचे औपचारिक उद्घाटन सावंतवाडीतील ज्येष्ठ बुद्धिबळ खेळाडू चंद्रकांत रणशूर यांच्या शुभहस्ते झाले. या प्रसंगी मुंबईतील जनार्दन लक्ष्मण शिर्सेकर शिक्षण संस्थेच्या अनुपमा शेटगे, कुडाळ येथील समीर राऊळ सर, मुख्य प्रशिक्षक बाळकृष्ण पेडणेकर, मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर, सरचिटणीस स्नेहा पेडणेकर आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी बोलताना चंद्रकांत रणशूर यांनी आपले वैयक्तिक अनुभव सांगत मुलांना बुद्धिबळ खेळण्याचे विविध फायदे स्पष्ट केले. मुक्ताई ॲकेडमी सातत्याने मुलांसाठी शिबीरे, प्रशिक्षण आणि स्पर्धांसारखे उपक्रम राबवत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. कौस्तुभ पेडणेकर व मुक्ताई ॲकेडमीच्या प्रयत्नांमुळेच आज जिल्ह्यातील मुले राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करत असून, बाळकृष्ण हा आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू आणि राज्य पंच होणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे रणशूर म्हणाले.
पालक प्रतिनिधी समीर राऊळ सर यांनी मनोगत व्यक्त करताना मुक्ताई ॲकेडमीतील कौस्तुभ पेडणेकर सरांचे शिस्तबद्ध वातावरण आणि बाळकृष्णच्या ॲडव्हान्स मार्गदर्शनाचा फायदा आपल्या मुलाला मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मार्गदर्शन शिबीरादरम्यान प्रशिक्षक बाळकृष्णने उपस्थितांना ओपनिंग, मिडलगेम, एण्डगेम, टॅक्टिकल गेम आणि स्पर्धेचे अधिकृत नियम याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच आगामी कालावधीत होणाऱ्या शालेय तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली. या यशस्वी शिबीरानंतर लवकरच कुडाळ, मालवण आणि वेंगुर्ला येथेही अशाच विशेष बुद्धिबळ मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा बाळकृष्णने केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभारप्रदर्शन मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर सर यांनी केले.












