सावंतवाडीत गौरी-गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरात आणि ग्रामीण भागात गणेशोत्सवानंतर गौरींचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. घरोघरी पारंपरिक पद्धतीने गौरी आणून त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. अनेक घरांमध्ये माहेरवाशिणीच्या रुपात येणाऱ्या महालक्ष्मी तथा गौराईचे स्वागत करताना महिलांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. यंदाही हा उत्साह कायम होता.
गणपतीचे आगमन झाल्यावर सोमवारी सोनपावलांनी गौरींचे घरोघरी आगमन झाले. सातव्या दिवशी गणपतीसह गौरींचे विसर्जन केले जाईल. पारंपरिक पद्धतीने विहिरी किंवा नदीकिनारी जाऊन वनस्पतींची विधिवत पूजा करून गौराई आणण्याची प्रथा आजही अनेक घरांमध्ये पाळली जाते. ग्रामीण भागात हा उत्सव विशेषतः मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, जिथे प्रत्येक घरात एक आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते.
म्हापसेकर कुटुंबात रक्तवर्णी गणेश आणि गौराईचे आगमन
शहरातील वैश्यवाडा येथील म्हापसेकर यांच्या निवासस्थानीही यंदा गौराईचे आगमन झाले. सावंतवाडीच्या राजघराण्याशी संबंधित काही कुटुंबांमध्ये रक्तवर्णी गणेशाची मूर्ती पूजण्याची प्रथा आहे आणि म्हापसेकर कुटुंब त्यापैकीच एक आहे. त्यांनी सालाबादप्रमाणे रक्तवर्णी श्री गणेशाची पूजा केली. तीन दिवसांच्या गौरींचे आगमन झाल्यानंतर त्यांची मनमोहक मूर्ती सजवून पूजा करण्यात आली. गौरी आगमनाने सर्वत्र एक उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, कुटुंबातील सदस्य मोठ्या श्रद्धेने या उत्सवात सहभागी झाले आहेत.














