ग्रामीण कुटा व क्रेडिट एक्सेस इंडिया फाउंडेशनतर्फे सावंतवाडीत सामाजिक आर्थिक विकास कार्यशाळा संपन्न

सावंतवाडी । प्रतिनिधी :ग्रामीण भागातील महिलांनी दैनंदिन आयुष्यात जबाबदारीने आर्थिक व्यवहार करावेत, तसेच आधुनिक काळातील वाढती सायबर गुन्हेगारी आणि डिजिटल फसवणुकीपासून अत्यंत सावध राहणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे, असे प्रतिपादन सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी केले. ‘क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड’ (ग्रामीण कुटा) आणि ‘क्रेडिट एक्सेस इंडिया फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने भटवाडी माजगाव येथील डायमंड बँक्वेत हॉलमध्ये आयोजित सामाजिक आर्थिक विकास कार्यशाळेत मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.
ते म्हणाले, आजच्या डिजिटल आणि तंत्रज्ञानाच्या युगात आर्थिक साक्षरता ही केवळ बचत करणे किंवा कर्ज घेण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. आपल्या कष्टाचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि स्वतःची डिजिटल सुरक्षा जपण्यासाठी आर्थिक साक्षर असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्याच्या काळात वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे महिलांनी कोणत्याही अनोळखी फोन कॉल, संशयास्पद मेसेज, ओटीपी शेअर करणे किंवा कोणत्याही पैशांच्या आमिषाला बळी न पडता अत्यंत सतर्कतेने व्यवहार केले पाहिजेत.
ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांची क्षमता वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या सामाजिक-आर्थिक कार्यशाळा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहेत. महिलांनी योग्य ठिकाणीच आर्थिक गुंतवणूक करावी आणि कोणत्याही आर्थिक व्यवहारात शंका आल्यास त्वरित पोलीस ठाण्याशी किंवा सायबर हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.
२९ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या या कार्यशाळेत सावंतवाडी व परिसरातील ग्रामीण भागातील ३०० हून अधिक महिला, विविध क्षेत्रांतील मान्यवर, अधिकारी आणि संस्थेच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. महिलांमध्ये जबाबदार कर्ज घेण्याची सवय निर्माण करणे, पत शिस्त पाळणे, सायबर फसवणुकीपासून बचाव आणि सर्वांगीण क्षमता विकास घडवून आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात स्थानिक समुदायातील सदस्यांनी सादर केलेल्या मंगल गीताने झाली. त्यानंतर रत्नागिरी (कोकण) विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक वैभव धर्मे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात या संपूर्ण उपक्रमाची पार्श्वभूमी व उद्दिष्टे स्पष्ट केली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. संस्थेच्या सामाजिक दायित्व विभागाच्या उपक्रमांची माहिती देत प्रातिनिधिक चित्रफित दाखवण्यात आली आणि महिलांना प्रभावी आर्थिक साक्षरतेचे मोलाचे प्रशिक्षण देण्यात आले.
या कार्यशाळेत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील असंसर्गजन्य रोग विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉ. अदिती कशाळीकर यांनी उपस्थितांना महिलांच्या आरोग्याविषयी अत्यंत मोलाची माहिती व मार्गदर्शन दिले. प्रशिक्षण सत्रानंतर सहभागी महिलांनी आपल्या मौल्यवान प्रतिक्रिया नोंदवत मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी क्षेत्र व्यवस्थापक योगेश कुरणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास रत्नागिरी विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक वैभव धर्मे, क्षेत्र व्यवस्थापक सिद्धाप्पा कुन्नूरे, सुरज कुराडे, महांतेश रायाप्पा गोल, आनंद पातावर, अमोल पवार, प्रथमेश पावसकर, सौरभ कांबळे, धीरज पवार, विशाल खोत, अनिल कांबळे, सुमन नाईक, प्रसाद बागायतकर, बाळू राठोड यांच्यासह संस्थेचे इतर पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












