ग्रामपंचायत आगवे येथे माजी सभापती व जि.प. सदस्य सौ. पूजा निकम यांच्याकडून विकासकामांचा आढावा

चिपळूण (प्रतिनिधी) : पंचायत समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजा शेखर निकम यांनी ग्रामपंचायत आगवे येथे विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी तसेच संबंधितांशी संवाद साधत गावातील विविध समस्या व विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या आढावा दरम्यान गावातील विविध प्रलंबित विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी, पाणी व आरोग्य सुविधा, शेतीविषयक कृषी योजना, शाळेतील शैक्षणिक सुविधा तसेच अंगणवाडीच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच १५ वा व १६ वा वित्त आयोगाच्या आराखड्याबाबतही चर्चा करण्यात आली. विशेषतः सन २०२१ पासून प्रलंबित असलेली विविध विकासकामे याबाबत सविस्तर चर्चा करून आवश्यक ती संमती घेवून संबंधित प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या सूचना देऊन आपले मत त्यांनी मांडले.,त्यामुळे गावातील विकासकामांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गावाच्या विकासासाठी उपलब्ध निधीचा योग्य व पारदर्शक पद्धतीने वापर करून नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि प्रलंबित प्रश्नांना प्राधान्याने सोडविण्यात यावे, तसेच ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी आगवे गावचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका तसेच जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका उपस्थित होत्या.