वैभववाडी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी. एस. ढगे यांचे निधन

वैभववाडी l प्रतिनिधी :          माध्यमिक विद्यालय उंबर्डे चे सेवा निवृत्त मुख्याध्यापक तथा ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय सदाशिव ढगे (वय ६६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या सहा-सात दिवसांपासून कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

श्री. ढगे यांचे मूळ गाव निगवे खालसा (ता. करवीर, जि. कोल्हापूर) होते. वैभववाडी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय उंबर्डे येथे त्यांनी तब्बल ३३ वर्षे सहाय्यक शिक्षक म्हणून सेवा बजावली.

त्यानंतर तीन वर्षे मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळत त्यांनी शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. सन २०१८ मध्ये ते सेवेतून निवृत्त झाले. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना शिक्षक संघटनेचा मुख्याध्यापक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. तसेच त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षक परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी पार पडली.

माध्यमिक अध्यापक पतपेढीचे संचालक म्हणून काम करताना त्यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी योगदान दिले. शिक्षकी पेशासोबतच श्री. ढगे यांनी पत्रकारितेची नाळही घट्ट जोडून ठेवली होती. विविध दैनिकांमध्ये बातमीदार म्हणून त्यांनी काम केले. वैभववाडी तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, मुलगा, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे.