सवणस खुर्द तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी शेख दाऊद आदम सुर्वे

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत सवणस खुर्दची ग्रामसभा सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी खेळीमेळीच्या आणि उत्साही वातावरणात पार पडली. ग्रामसभेदरम्यान गावातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याच बैठकीत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, सवणस खुर्दच्या अध्यक्षपदी श्री. शेख दाऊद आदम सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली.
ग्रामसभेत सर्वानुमते झालेल्या या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील शांतता, सामाजिक सलोखा, एकोपा आणि बंधुभाव कायम राखण्यासाठी तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाते. गावातील विविध समस्या व तंटे सामोपचाराने सोडविण्यासाठी तसेच ग्रामस्थांमध्ये परस्पर सहकार्य आणि समन्वय वाढविण्यासाठी समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.
शेख दाऊद आदम सुर्वे यांच्या अध्यक्षपदी नियुक्तीबद्दल सवणस खुर्द ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सवणस खुर्द गावात शांतता, सलोखा आणि बंधुभाव अधिक दृढ होऊन गावाच्या विकासाला चालना मिळावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.