यापुर्वी कार्यक्रम झाल्याचे दाखवून बिल काढणाऱ्या एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाने मंगळवारी पुन्हा घेतला तोच कार्यक्रम

सत्ताधाऱ्यांचा या भ्रष्टाचाराला पाठींबा आहे काय? उपसभापती अभिजित गुरव यांचा सवाल

राजापूर प्रतिनिधी :पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या वतीने एकच कार्यक्रम घेऊन त्याची दोन वेगवेगळी बीले काढून शासनाच्या निधीच्या झालेल्या गैरप्रकाराबाबत आपण चौकशीची व संबधित प्रभारी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी केलेली असतानाही त्यांच्या या भ्रष्टाचारी कारभाराला आमचे सत्ताधारी पाठीशी घालत असल्याचा आरोप भाजपा जिल्हा सरचिटणीस व उपसभापती अभिजित गुरव यांनी केला आहे. आपण हा मुद्दा पुढे आणल्यानंतर चौकशी सुरू असताना आता न घेतलेला दुसरा कार्यक्रम मंगळवारी १ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला, मात्र अशा प्रकारे यापुर्वीच हा कार्यक्रम झाल्याचे दाखवून त्याचे पैसे लाटण्यात आले त्याचे काय? असा सवाल गुरव यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी आपण गप्प बसणार नसून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांसह राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री ना. आदिती तटकरे यांची भेट घेऊन हे प्रकरण धसास लावणार असल्याची माहिती गुरव यांनी दिली आहे.

मंगळवारी पत्रकार परिषद घेत गुरव यांनी आपली भूमिका मांडली. अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणासाठी व उत्कृष्ठ कार्यपध्दतीसाठी पंचायत समिती सेस व जिल्हा परिषद सेस अनुदानातुन दहा टक्के रक्कम या विभागासाठी राखीव ठेवली जाते. यातुन या विभागाने ही प्रशिक्षणे घ्यावयाची आहेत, तर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी यातुन क्रमांक काढून बक्षिसही द्यायचे आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद अशा दोन्ही विभागांतील या सेस अनुदानातुन राखीव रक्कम यावर खर्च करताना यासाठी दोन वेगवेगळे कार्यक्रम घ्यावयाचे आहेत. तसे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. तसे असतानाही या विभागाने एकच कार्यक्रम घेतला व ३१ मार्च २०२६ रोजी या एकाच कार्यक्रमाची दोन वेगवेगळी बिले काढून ती मंजूर करून घेतली व रक्कम खर्च दाखविली. यातील एक बील हे ४१ हजार ६० आहे तर दुसरे ९९ हजार ६०० इतके असल्याचे गुरव यांनी सांगितले.

याबाबत आपण सभागृहात मुद्दा उपस्थित केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती. गटविकास अधिकारी यांनी प्रभारी प्रकल्प अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. मात्र असे असतानाही आता हा कार्यक्रम पुन्हा घेण्यात आला आहे, म्हणजे जणू अगोदर बील खर्च टाकून पैसे काढल्याचे मान्यच केले जात आहे असेही गुरव यांनी सांगितले. राजकिय दबावापाटी हे सगळे केले जात असल्याचा आरोपही गुरव यांनी केला.

अशा प्रकारे मंगळवारी कार्यक्रम घेत आहोत असे सांगण्यासाठी त्या प्रभारी प्रकल्प अधिकारी माझ्या दालनात आल्या होत्या. मात्र हे चुकीचे आहे, तुम्ही दोन दिवस थांबा असे मी त्यांना सांगितले. यावर त्यांनी आंम्हाला कार्यक्रम घ्यावयास सांगितला आहे असे सांगितले. या विभागाचे प्रमुख हे उपसभापती आहेत, मात्र त्यांना डावलून परस्पर असे ठरविले जात असून हे अत्यंत चुकीचे आहे असे गुरव यांनी सांगितले.

मंगळवारी तालुका पंचायत समितीच्या किसान भवन सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. याला सभापतींसह सर्वच सदस्यांनी हजेरी लावली. या विभागाने दोन वेगवेगळे कार्यक्रम करावयाचे असताही एकच कार्यक्रम करून ३१ मार्च रोजी दोन कार्यक्रमांची वेगवेगळी बिले काढून घेतली, कार्यक्रम झाल्याचे दाखवले, निधी खर्च केला असे दाखविले मग आजचा कार्यक्रम कशासाठी असा सवाल उपस्थित करत या विभागाने केलेल्या या भ्रष्टाचाराला या सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा आहे काय? असा खडा सवाल गुरव यांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणी आपण जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी व राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री ना. आदिती तटकरे यांची भेट घेऊन त्यांच्या ही बाब निदर्शनास आणून देणार आहोत. अशा प्रकारे शासनाच्या निधीचा गैरवापर करण्याऱ्यांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आपली ठाम भूमिका असून कुणी कितीही राजकिय दबाव आणला तरी त्याला न जुमानता हे प्रकरण धसास लावणार असल्याचे गुरव यांनी सांगितले.