शिरगाव येथील वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावणारा आरोपी डोंबिवलीत जेरबंद

वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावणारा आरोपी डोंबिवलीत जेरबंद

देवगड : शिरगाव-साटमवाडी येथे वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून चोरी करणाऱ्या आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने डोंबिवली येथून शिताफीने ताब्यात घेतले. तन्मय राजेंद्र साटम (वय २९, मूळ रा. शेवरे, शिरगाव, ता. देवगड, सध्या रा. दोन टाकी, धर्मा चाळ, गरीबाचा वाडा, डोंबिवली पश्चिम) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

शिरगाव-साटमवाडी येथे १६ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली होती. जयश्री सदाशिव बावसकर यांच्या गळ्यातील सुमारे २५ ग्रॅम वजनाची आणि अंदाजे १ लाख ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची माळ अज्ञात व्यक्तीने हिसकावून नेली होती. याप्रकरणी १७ ऑगस्ट रोजी पहाटे १२.३९ वाजता देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. मानवी कौशल्य, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर १ सप्टेंबर रोजी डोंबिवली येथील गणेशनगर परिसरात सापळा रचून तन्मय साटम याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, आरोपीविरुद्ध यापूर्वी ठाणे पोलीस आयुक्तालयातील शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा दाखल असून, या गुन्ह्यात तो पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला २ सप्टेंबर रोजी पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी देवगड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, एएसआय राजेंद्र जामसंडेकर, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर तवटे, आशिष गंगावणे आणि किरण देसाई यांच्या पथकाने केली.